शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी ५ वर्षांपासून लाभापासून वंचित ! – सुनील कदम, जिल्हाध्यक्ष, युवाशक्ती ग्रामविकास संघटना
सातारा, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या (‘एन्.एम्.एम्.एस्.’च्या) अंतर्गत असणार्या परीक्षांची शिष्यवृत्ती गत ५ वर्षांपासून पात्र विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. शिक्षण विभागातील काही अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांनी दिली.
‘शिक्षण विभागातील या भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय द्यावा’, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य शासन यांच्या वतीने आर्थिक दुर्बल अन् वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. अशा शिष्यवृत्ती परीक्षा अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थी दिवसरात्र एक करून उत्तीर्ण होतात. पुढील शिक्षणाच्या आर्थिक साहाय्यासाठी विद्यार्थी ही शिष्यवृत्ती मिळवतात; परंतु अनेक पात्र विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे आढळून आले आहे. हे सूत्र अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे.
संपादकीय भूमिकाहा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे कि शिष्यवृत्ती योजनेचे पैसे मधल्यामधे कुणी लाटत आहे ? याची चौकशी व्हायला हवी ! |