सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !
आज, १८ ऑक्टोबर (आश्विन शुक्ल चतुर्थी) या दिवशी सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
१. कोणतीही परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाणारे पू. चत्तरसिंग इंगळेकाका !
अ. ‘वर्ष २०२० ते २०२२ ही दोन वर्षे कोरोना महामारीचा काळ होता. त्यामुळे सर्व साधकांची समष्टी प्रचार सेवा बंद होती. त्या वेळी पू. चत्तरसिंग इंगळेकाका घरीच होते. तेव्हा त्यांच्या पायाला अस्थीभंग (‘फ्रॅक्चर’) झाला होता. ते कितीतरी मास (महिने) अंथरुणावर पडून होते, तसेच त्यांचे वय झाल्यामुळे त्यांची प्रकृतीही ठीक नव्हती.
आ. मला कोरोना महामारीच्या पूर्वी पू. इंगळेकाकांना तेल लावून मर्दन करणे आणि त्यांची दृष्ट काढणे, या सेवा गुरुकृपेने मिळाल्या होत्या. या सेवा माझ्या माध्यमातून गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) करून घेतल्या. त्यांच्या जिभेला आजारपणामुळे चव नव्हती, तरी ते परिस्थिती स्वीकारून आनंदी असायचे.
२. सेवेची तळमळ
अ. आम्ही पू. इंगळेकाका यांच्या समवेत पुष्कळ वेळा शाळेत प्रश्नमंजुषा (सनातन संस्थेच्या वतीने शाळेत घेतल्या जाणार्या उपक्रमांतर्गत मुलांना विचारलेले काही प्रश्न) या सेवेसाठी जात होतो. त्या वेळी ते शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रथम ४५ मिनिटे प्रबोधन करायचे आणि नंतर आम्ही मुलांची प्रश्नमंजुषा घेत होतो. त्यानंतर आम्ही ते प्रश्न पडताळण्यासाठी आश्रमात घेऊन जात होतो. प्रश्न पडताळून झाल्यावर आम्ही दुसर्या किंवा तिसर्या दिवशी शाळेत पुन्हा पुरस्कार वितरणासाठी जात होतो. त्या वेळी पू. इंगळेकाका यांच्याकडून ‘सेवेचे पूर्वनियोजन कसे करावे ? सेवेची तळमळ कशी असायला हवी ?’, हे मला शिकायला मिळायचे.
आ. प्रश्नमंजुषा झाल्यानंतर आम्ही शाळेच्या शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शन लावत होतो. त्या वेळी पू. इंगळेकाका स्वतः उत्पादन आणि ग्रंथ वितरण करून त्याविषयी माहिती सांगायचे. त्या वेळी त्यांचा ‘गुरुदेवांचे साहित्य सर्वांपर्यंत पोचले पाहिजे’, असा भाव असायचा.
इ. भिलाई येथील कारखान्याच्या ‘बोरिया’ गेटजवळ सकाळी बाजार असायचा. त्या बाजारात आम्ही सर्व साधक पहाटे चार-साडेचार वाजता पंचांग वितरणासाठी जात होतो. त्या वेळी पू. काकाही आमच्या समवेत सेवेला यायचे. ते शेवटपर्यंत ग्रंथ वितरण कक्षावर असायचे. त्यामुळे आमचाही सेवेचा उत्साह शेवटपर्यंत टिकून रहायचा.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेली श्रद्धा !
काही वर्षांपूर्वी दुचाकी चालवतांना इंगळेकाका यांचा मोठा अपघात झाला होता. ते कितीतरी दूर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्याविषयी पू. काका कृतज्ञतेने सांगायचे की, ‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. हे जीवन गुरुदेवांचे आहे. नाहीतर मी कधीच संपलो होतो.’ त्या वेळी ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रतीचा भाव !
पू. चत्तरसिंग इंगळेकाका यांचा परात्पर गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती) अपार भाव होता. ‘मला गुरुदेवांनी सेवा दिली आहे. ती सेवा परिपूर्ण करून मला त्यांची कृपा संपादन करायची आहे’, असे ध्येय ते सतत स्वत:समोर ठेवायचे. ‘आपली प्रत्येक कृती साधनेला धरून हवी आणि प्रत्येक कृतीतून आपली साधनाच व्हायला हवी’, असे ते नेहमी म्हणायचे.
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे आम्हाला पू. इंगळेकाकांसारखे पितृतुल्य संत लाभले. त्यांच्या समवेत सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांनी आम्हा सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी सेवा करवून घेतली. आजपर्यंत मी पू. इंगळेकाकांची जी काही सेवा झाली, ती केवळ आपल्या कृपेमुळेच झाली. त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. अनुपमा कानस्कर, भिलाई, दुर्ग, छत्तीसगड. (३.१०.२०२२)