टपाल विभागाच्या पोस्टकार्डावर सातारा येथील ‘बाजीराव’ विहिरीला स्थान !

‘राष्ट्रीय पोस्ट दिना’निमित्त केंद्रशासनाकडून गौरव

बाजीराव विहिरीचे स्थान

सातारा – महाराष्ट्रातील ७ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी विहीर अशी ख्याती असलेल्या सातारा येथील बाजीराव विहिरीला टपाल विभागाच्या ‘पोस्टकार्ड’वर स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील ७ ऐतिहासिक स्थळांना केंद्रशासनाच्या आदेशाने पोस्टकार्डावर छायाचित्र प्रसिद्ध करण्यास अनुमती मिळाली आहे. पुणे येथील ‘एम्.आय.टी. स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ आणि सातारा येथील ‘वारसा ग्रुप’ यांच्या संयुक्त सहकार्याने यासाठीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘हा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा मोठा गौरव आहे.’’

१. सातारा शहरातील शुक्रवार पेठ ही बाजीराव पेठ म्हणून ओळखली जाते, हे अल्प लोकांना ठाऊक आहे. छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्यामध्ये याच विहिरीच्या दुसर्‍या मजल्यावरील दालनात खलबते चालत असत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच या विहिरीचे बांधकाम झाल्याची इतिहासात नोंद आहे.

२. या विहिरीच्या संवर्धनाचे उत्तरदायित्व वारसा समुहाचे अध्यक्ष राजेंद्र कानिक यांच्याकडे आहे. ‘एम्.आय.टी. स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ विभागाचे रोहन काळे, हेमंत लंगडे, धनंजय अवसरे, शैलेश करंदीकर यांनी परिश्रमपूर्वक या विहिरीच्या रचनेचा अभ्यास करून विहीर संवर्धनाचा प्रस्ताव दिला होता.

३. अमरावती, पुणे, सातारा, वाखरी येथे स्टेप वेल प्रकारातील एकूण ७ विहिरी आहेत. सातारा येथील बाजीराव विहीर ही ७ व्या क्रमांकाची मोठी विहीर आहे. पुष्करणी, पोखरण, पाय, विहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या स्टेप वेल मधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील ८ छायाचित्रांचा समावेश केंद्रशासनाच्या पुस्तिकेत करण्यात आला आहे.

४. ही विहीर १०० फूट खोल असून तिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. या विहिरीला ९ कमानी असून या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे दगडी शिल्प राजचिन्हासह कोरण्यात आलेले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे असून ज्या वेळी कास आणि खापरी नळ पाणीपुरवठा योजना होती, त्या वेळी याच विहिरीचे पाणी उपयोगात आणले जात होते.