बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘सेवा म्हणजे शेताप्रमाणे ! शेतामध्ये जसे नाना प्रकारचे पीक पिकवता येते, त्याप्रमाणे सेवेमधूनही अनेक प्रकारे लाभ करून घेता येतात. शरिराने सेवा केली असता आरोग्य लाभते. वाचेने सेवा घडली, तर कुसंस्कारांचा नाश होऊन हृदय पवित्र होते. सेवा मनापासून झाली, तर शाश्वत शांती आणि समाधान लाभते. धनाने सेवा केली असता सहस्र पटींनी धन मिळते.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘सेवा’, सुवचन क्र. ६)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. ‘दुःखी आणि कष्टी लोकांसाठी काहीतरी करणे’, म्हणजे ‘सेवाधर्म’ ! : ‘आपल्याला शाळेमध्ये सानेगुरुजींची एक बोधक अशी कविता शिकवली जाते; परंतु तिचा अर्थ मात्र आपल्या हृदयापर्यंत पोचतोच, असे नाही. केवळ प्रार्थना म्हणून आपण हे गाणे गात असतो आणि त्या गाण्याचे वरवर कौतुक करत असतो; परंतु ‘आपण त्या गाण्याप्रमाणे आचरण करतो का ?’, हे पाहिले पाहिजे.
खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥
जगी जे हीन अतिपतित । जगी जे दीन पददलित ।तया जाऊन उठवावे ॥ १ ॥
जगात अनेक दुःखी-कष्टी लोक असतात. काही जण असाध्य रोगाने पिडलेले असतात, तर काही लोकांना सुख-सुविधा आणि सोयी प्राप्त झालेल्या नसतात. काही जण खेडोपाड्यात रहात असल्यामुळे त्यांना शिक्षण मिळत नाही; किंबहुना त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सोयी पोचत नाहीत. अनेक लोकांना चांगली घरे नसतात. अनेकांना अंगभर कपडे नसतात. अशा लोकांसाठी आपल्या हातून काहीतरी घडणे, म्हणजेच ‘सेवाधर्म’ !
२ आ. ‘अडल्या-नडलेल्या लोकांना आपल्या क्षमतेप्रमाणे साहाय्य करणे’, हे व्यक्तीचेे मानवजातीसाठीचे कर्तव्य आहे ! : नैसर्गिक संकटेे, राजकीय अनास्था आणि युद्ध यांमुळे माणसांवर शारीरिक अन् मानसिक आघात होत असतात. नैसर्गिक संकटे, म्हणजे वादळ, पूर, भूकंप इत्यादींमुळे माणूस पुरता नाडला जातो. त्याचे सर्वस्व नष्ट होते. त्या वेळी त्याला कुणाच्या तरी साहाय्याची आवश्यकता असते. अशा वेळी अनेक सेवाभावी संस्था आपल्या स्वयंसेवकांना घेऊन जातात आणि अशा लोकांना साहाय्य करतात. ‘अशा संस्थांच्या कार्यात सहभागी होऊन सामान्य माणसानेही आपल्या क्षमतेप्रमाणे इतरांना साहाय्य करणे’, हे त्याचे मानवजातीसाठीचे कर्तव्य असते.
२ इ. सेवाभावाविषयीची काही उदाहरणे
१. सेवा करण्यासाठी माणूस शरीर आणि मन यांनी खंबीर अन् सामर्थ्यवान असावा लागतो; म्हणूनच बुद्धीमान, बलशाली आणि चतुर, असा हनुमान श्रीराम, लक्ष्मण अन् सीता यांची आयुष्यभर चांगल्या प्रकारे सेवा करू शकला.
२. भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची पुष्कळ सेवा केली आणि तो त्या सेवेत इतका एकचित्त झाला की, साक्षात् भगवंत त्याच्या समोर येऊन उभा राहिला, तरी त्याचे चित्त आई-वडिलांच्या सेवेपासून ढळले नाही.
३. समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांनी समर्थ रामदासस्वामींची अत्यंत एकनिष्ठपणे सेवा केली. इतकेच नव्हे, तर त्यांना पूर्ण दासबोध मुखोद्गत होता.
४. सांप्रतकाळात श्री. बाबा आमटे आणि श्री. प्रकाश आमटे यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अर्पण केले.
२ ई. दुसर्यांची सेवा केल्याने होणारे लाभ : आपणच जर दुबळे असलो, तर आपल्याला दुसर्याची सेवा करता येत नाही; म्हणून आधी स्वतः समर्थ, शरिराने सशक्त आणि मनाने खंबीर व्हावे लागते.
१. ‘दुसर्याची सेवा करतांना आपल्याला अनेक लाभ होतात’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात. जसे शेताची मशागत केली असता त्या शेतातून आपल्याला चांगले धान्य पिकवता येते, तसे दुसर्याची सेवा केल्यामुळे आपल्याला एक वेगळेच मानसिक समाधान मिळते.
२. सेवा केल्याने आपले शरीर काटक बनते, तसेच कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्याची एक अलौकिक शक्ती आपल्या शरिरामध्ये प्रविष्ट होते.
३. दुसर्यांची सेवा केल्यामुळे आपले आरोग्यही सुधारते. जेवढे शरिराला कामाला लावाल, तेवढे शरीर ते काम चांगल्या प्रकारे करू शकते. केवळ शरिराला वळवण्याची आपल्या मनाची सिद्धता असावी लागते.
२ उ. कीर्तन-प्रवचन करण्यासाठी मानधन घेणार्यांची सेवा न होता ते पोट भरण्याचे माध्यम होऊन सेवेला विराम मिळतो ! : प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘वाचेनेसुद्धा आपल्याला दुसर्यांची सेवा करता येते. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे कीर्तन, प्रवचन, लेखन इत्यादी’; परंतु कीर्तन आणि प्रवचन करण्यासाठी जर कुणी मानधन घेत असेल, तर मात्र ती सेवा न होता पोट भरण्याचे साधन होते आणि सेवेला विराम मिळतो. सध्या आपल्याला समाजात असे पोटभरू कीर्तनकार आणि प्रवचनकार शेकडोंनी मिळतील; परंतु संत तुकाराम महाराज यांनी त्यांची निंदा केलेली आहे. ‘हरिनाम घेत असतांना आणि हरिनामाचे महत्त्व सांगत असतांना त्याचा मोबदला पैशात घेणे’, हे शुद्ध पाप आहे’, असेही त्यांनी एका अभंगात म्हटले आहे.
कथा करूनया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । न ये नारायणा करुणा त्यांची ॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥
– तुकाराम गाथा, अभंग ९६८
अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘हरिकथा करून जे द्रव्य घेतात आणि देतात, त्या दोघांची अधोगती होऊन त्यांना नरकप्राप्ती होते. ते रौरव आणि कुंभपाक यांच्या नरकयातना भोगतात. नारायणालाही त्यांची करुणा येत नाही. यमदूत तलवारीच्या धारेने त्यांचे शरीर छेदतात आणि त्यांना तप्त भूमीवर लोळवतात. अशा लोकांच्या नरकयातना कधीही चुकत नाहीत. ते प्रत्यक्ष यमाच्या हातीच सापडलेले असतात.
‘मानधन घेणारे आणि पोटभरू कीर्तनकार कसे असतात ?’, याचे वर्णन संत तुकाराम महाराज यांनी पुढील अभंगात केले आहे. ते म्हणतात,
कथा करूनियां दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥
तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥
टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेवीण डोळे गळताती ॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥
– तुकाराम गाथा, अभंग ४३७
अर्थ : काही लोक हरिकथा करतांना ‘हरीविषयी प्रेम आहे’, असे दाखवतात; परंतु त्यांच्या अंतरंगात कुकर्माविषयी विशेष जिव्हाळा असतो. असा माणूस स्वतः नीच असून बारा टिळे लावतो, तसेच डोक्यावर टोपी आणि गळ्यात माळा घालतो. तो आपले पोट भरण्यासाठी तुळस, दर्भ, शेंडी ठेवणे, अशी देवाची सांभाळ जवळ बाळगतो. असा मनुष्य गोसाव्याचे रूप धारण करतो; परंतु त्याच्या अंतरंगात परस्त्रीविषयी विषयवासना जागृत असते. त्याच्या अंतरंगात काम, लोभ आदी विकार असतात. तो पडतो, लोळतो, त्याच्या डोळ्यांतून प्रेमाविना नुसतेच पाणी गळत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘असले मायेचे मैंद (ईश्वरापासून दूर नेणारे लोक) ढोंगी आणि लबाड असतात. त्यांच्याजवळ गोविंद नसतोच !’
२ ऊ. वाचिक सेवेमुळे होणारे लाभ : वाचिक सेवेमुळे आपले मन पवित्र आणि शुद्ध होते. आपल्या ओठांवर सतत ईश्वराचे नाम रहाते. कुसंस्कारांचा नाश होतो. आपल्या मनावर सुसंस्कार होतात आणि त्याच वेळी ते इतरांवरही होत असतात. त्याचे पुण्य आपल्या पदरी साठत असते.
२ ए. इतरांना साहाय्य केल्याने आयुष्यात काहीच न्यून पडत नाही ! : आपण जर कुणाला पैशांचे साहाय्य केले, तर आपण केलेल्या साहाय्यापेक्षा अनेक पटींनी धन आपल्याकडे येते. गरिबांना केलेले शिक्षणासाठीचे साहाय्य, ज्यांना रहायला घर नाही, अशांना घरासाठी केलेले साहाय्य; नैसर्गिक संकटांमुळे ज्यांचे सर्वस्व गेले आहे, अशांना जीवनोपयोगी वस्तूंचे केलेले साहाय्य आपल्याला पुण्यकारक ठरते. आपल्याला आयुष्यात नंतर काहीच न्यून पडत नाही. काही न्यून पडलेच, तर ईश्वर कोणाच्यातरी रूपाने आपल्याला साहाय्य करण्यासाठी आपल्या पाठीशी उभा राहतो; म्हणून माणसाने इतरांना जमेल तितके साहाय्य करणे आवश्यक असते.
२ ऐ. दान सत्पात्री असावे आणि ते गुप्त ठेवावे ! : दान करावे; पण ते सत्पात्री असावे. ज्याला आवश्यकता नाही, अशांना दान करू नये. ज्यांना आपण दिलेल्या दानाचे काहीच मूल्य वाटत नाही, अशा कृतघ्न माणसांनाही दान करू नये. त्यामुळे आपले दानाचे पुण्य वाया जाते. आपण केलेले दान कुणालाही सांगू नये. ‘आम्ही दान केले, आम्ही दान दिले’, असे जोरजोरात ओरडून सांगू नये. त्यामुळे दानाचे महत्त्व न्यून होऊन आपल्या मनात अहंकार वाढत जातो.
२ ओ. परस्परांच्या सहकार्याने आपण समाजात सुख निर्माण करू शकतो आणि सामाजिक उन्नती करू शकतो ! : ‘सेवाधर्म’, हा अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘एक एका साह्य करूं । अवघे धरू सुपंथ ॥’, (म्हणजे ‘अहो, जनहो, तुम्ही आणि आम्ही (सर्व जण) मिळून एकमेकांच्या साहाय्याने चांगली वाट धरूया.’) परस्परांच्या सहकार्याने आपण आपल्या समाजात सुख निर्माण करू शकतो आणि सामाजिक उन्नती करू शकतो. सामाजिक उन्नती झाली की, देशाची उन्नती व्हायला वेळ लागत नाही; म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या पसायदानामध्ये सर्व जणांसाठी सुख आणि आनंद मागतात. ते ईश्वराकडे प्रार्थना करतात,
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हे ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९३
अर्थ : आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि संतुष्ट होऊन मला हे पुढील प्रसाददान द्यावे.
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४
अर्थ : खलांचा (दुष्टांचा) कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी, तसेच प्राणीमात्रांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी.
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५
अर्थ : पापाचा अंधार जावा आणि विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणीमात्रात जो जे इच्छील, ते त्याला प्राप्त व्हावे.
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९६
अर्थ : ईश्वरनिष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करत या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो.
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९७
अर्थ : चालणार्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव आणि अमृताचे बोलणारे सागर आहेत.
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९८
अर्थ : जे कलंकरहित चंद्र आहेत आणि जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत.
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९९
अर्थ : फार काय सांगावे ? तिन्ही लोकांनी (स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ यांनी) सर्व सुखांनी पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजन करावे.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १८००
अर्थ : आणि महाराज, या लोकात विशेषकरून हा ग्रंथच ज्यांचे जीवन आहे (अत्यंत प्रिय होऊन राहिला आहे), त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे.
संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानात म्हणतात, ‘जशी ज्याची इच्छा होईल, ते ते सर्व त्यांना मिळावे. जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत. लोकांच्या मनातील वाईट वृत्ती नाहीशी व्हावी आणि त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी.’ असे झाले, तर ‘जगातील सर्व माणसे सुखी होतील आणि मिळालेले आयुष्य आनंदाने व्यतीत करतील’, यात शंकाच नाही.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१७.८.२०२३)