स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इस्रायलचे भारताच्या दृष्टीकोनातून जाणलेले महत्त्व !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतीज्ञ, द्रष्टे होते, काळाच्या पुष्कळ पुढचे पहाणारे होते. त्यांनी स्वतःच म्हटले होते की, माझे विचार तुम्हाला ५० वर्षांनी पटतील; पण आपले दुर्दैव असे की, त्यांचे विचार पटायला आपल्याला ५० वर्षेही पुरलेली नाहीत. त्यांचा इस्रायलविषयीचा एक विचार पटायला तर आपल्याला ९४ वर्षे जावी लागली !
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यू राज्याच्या निर्मितीला दिलेला पाठिंबा :
रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात स्वतंत्र ज्यू राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता. सावरकर लिहितात, ‘‘ज्यू लोकांची सुखस्वप्ने खरी झाली नि पॅलेस्टाइन हे ज्यू लोकांचे राष्ट्र म्हणून निर्माण झाले, तर आम्हाला प्रत्यक्ष ज्यू लोकांइतकाच आनंद होईल.’’ युरोपमधून हाकलण्यात येत असलेल्या ज्यूंसंबंधी सहानुभूती व्यक्त करून सावरकर वर्ष १९३८ मध्ये काढलेल्या पत्रकात लिहितात, ‘‘त्यांना भारतात निवासासाठी न आणता पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी वस्ती करावी; कारण तीच त्यांची पितृभू (वडिलोपार्जित भूमी) आणि पुण्यभू (धर्माचा उगम झाला ती भूमी) आहे.’’ ज्या वेळी इस्रायलची निर्मिती झाली, तेव्हा बहुसंख्य ज्यूंनी इस्रायलमध्ये स्थायिक होणे पसंत केले, तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या ज्यूंनी इस्रायलच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले.
२. इस्रायलच्या निर्मितीनंतर सावरकर यांनी केलेले ‘ऐतिहासिक निवेदन :
इस्रायलच्या निर्मितीनंतर १९ डिसेंबर १९४७ या दिवशी केलेल्या ‘ऐतिहासिक निवेदनात’ सावरकर लिहितात, ‘‘जगातील बहुसंख्य प्रमुख देशांनी पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राज्य स्थापण्याचा ज्यू लोकांचा अधिकार मान्य केला आणि त्यासाठी शस्त्रास्त्रांचे साहाय्यही देण्याचे वचन दिले. ही वार्ता वाचून मला आनंद झाला. या प्रश्नी आपली भारतीय वृत्तपत्रे त्यांच्या मुसलमानमधार्जिण्या धोरणाला धरून चुकीची माहिती देत आहेत. वस्तूस्थिती अशी आहे की, मुसलमानी धर्माच्या स्थापनेपूर्वी निदान २ सहस्र वर्षे अब्राहम, मोझेस, डेव्हिड, सालोमन यांच्यासारखे अनेक राजे नि ऋषी यांनी त्या देशाला पितृभू नि पुण्यभू मानले. अरबी मुसलमानांनी सिंधवर आक्रमण करण्यापूर्वी, प्राचीन इजिप्त आणि पर्शिया यांवर स्वारी करून तेथील संस्कृती रानटी प्रवृत्तीने नष्ट केली. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यूंनाही मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण ही त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. अरबी मुसलमानांची पितृभूमी नि पुण्यभूमी आहे अरबस्तान, पॅलेस्टाईन नव्हे ! हा इतिहास आमची वृत्तपत्रे आणि नेते यांनी समजून घ्यावा.’’
३. ज्यू राज्य निर्मितीला पाठिंबा न देऊन काँग्रेसच्या तत्कालीन नेहरू सरकारने स्वतःचे करून घेतलेले हसे :
या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांतील भारतीय प्रतिनिधींनी ज्यू राज्य निर्मितीला केलेला विरोध दुःखदायक आहे. या संबंधीच्या भाषणात श्रीमती विजयालक्ष्मी म्हणाल्या, ‘‘स्वतंत्र ज्यू राज्य निर्माण करण्यास पाठिंबा देऊन आम्ही पॅलेस्टाईनच्या पाठीत सुरा खुपसण्याचे पाप करणार नाही.’’ हे त्यांचे वाक्य अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना नाटकी वाटून त्यांनी त्यांची टर उडवली; कारण याच भारताने स्वतःच्या अनेक वर्ष एक असलेल्या देशाच्या फाळणीला मान्यता देऊन तो फाळणीचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला होता. यासंबंधी नेहरूंनी जेव्हा सांगितले, ‘‘आशियातील छोट्या इस्लामी देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपण ज्यू राज्याला विरोध केला.’’ तेव्हा तर त्यांची बाजू अधिकच असमर्थनीय ठरली; कारण या वेळी त्यांनी भारतातील आणि जगातील ज्यू अन् त्यांना पाठिंबा देणार्या बलवान देशांना काय वाटेल ? याचा विचार केला नाही. छोट्या, दुर्बल देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी मोठ्या सबल देशांची सहानुभूती गमावण्याचे हे धोरण अयोग्य आणि हास्यास्पद आहे.
४. ज्यू लोकांविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मत :
या वेळी त्यांनी हेही लक्षात ठेवायला हवे, ‘‘ही छोटी इस्लामी राज्ये आणि चीनमध्येही इस्लामी राज्य निर्माण करण्याची मागणी करणारे हे सर्व इस्लामी गट भारतात इस्लामी राज्य स्थापन करणार्या पापस्तानी गटालाच पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आफ्रिकेपासून मलेशियापर्यंत एक मुसलमान आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या इस्लामी गटाची शक्ती खच्ची करण्याचेच आंतरराष्ट्रीय धोरण अवलंबले पाहिजे. या आक्रमक इस्लामी शक्तीचा प्रतिकार करण्याचे कार्य समर्थ आणि स्वतंत्र ज्यू राज्य करू शकेल. ज्यू लोकांच्या मनात हिंदुजगतासंबंधी द्वेष नाही. भारतातील अल्पसंख्य ज्यूंविषयी संशय बाळगण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आजच्या काँग्रेसी नेत्यांचे धोरण कसेही असले, तरी भारतातील हिंदु संघटनावादी पक्षाने नैतिक आणि राजकीय धोरण म्हणूनही स्वतंत्र ज्यू राज्याला स्वतःचा संपूर्ण पाठिंबा देऊन त्याविषयी सदिच्छाही व्यक्त केली पाहिजे.’’
५. ‘भारताने इस्रायलला मान्यता का देणे आवश्यक आहे ?’, याविषयी सावरकर यांचा महत्त्वपूर्ण विचार :
वर्ष १९५६ मध्ये जोधपूर इथल्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनात सावरकर यांनी इस्रायलविषयी अतिशय महत्त्वाचा विचार मांडला. ‘‘भारताने इस्रायल सोडून जगातील बहुतेक राष्ट्रांना मान्यता दिली आहे. इस्रायलला मान्यता दिली, तर ते कृत्य मुसलमानविरोधी मानले जाईल, ही भारताला भीती आहे; पण उद्या जर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटले, तर बहुतेक मुसलमान राष्ट्रे आपल्याविरुद्ध पाकिस्तानच्या पाठीशी उभी रहातील आणि त्यांचा शत्रू असलेला इस्रायल आपला एकटा मित्र उरेल. त्यामुळे भारताने इस्रायलला नि:संदिग्ध मान्यता द्यावी.’’
‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी आज इस्रायलशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत, हे अतिशय स्वागतार्ह आहे.