Rajasthan Congress : मुलासाठी नोकरी मागण्यास गेलेल्या वृद्धाच्या पगडीला काँग्रेसच्या आमदाराने लाथ मारली !

वृद्धाचा केला अवमान !

वृद्धाच्या पगडीला लाथ मारताना काँग्रेसचे आमदार राजेंद्र सिंह बिधूडी

उदयपूर (राजस्थान) – चित्तौडगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदार राजेंद्र सिंह बिधूडी यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक वृद्ध स्वतःच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी बिधूडी यांच्या पायावर डोक्यावरची पगडी ठेवून याचना करत आहे; मात्र बिधूूडी या वृद्धाची पगडी पायाने उडवून लावत त्यांना ओरडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ वर्ष २०२१ चा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओ संदर्भात आमदार बिधूडी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैरूलाल चौधरी यांनी म्हटले, ‘जर हा व्हिडिओ खरा असेल, तर ही घटना योग्य नाही. तरीही बिधूडी एक उत्तरदायी आमदार आहेत. त्यामुळे वाटते की, हा व्हिडिओ संकलित (एडिट) केलेला असू शकतो.’ दुसरीकडे भाजपचे खासदार सी.पी. जोशी यांनी म्हटले की, बिधूडी यांनी असे वागण्याचे हे पहिले प्रकरण नाही. अशांना जनता नक्कीच धडा शिकवेल.

संपादकीय भूमिका 

अशा काँग्रेसला राजस्थानमधील जनता आताच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल, असेच कुणालाही वाटेल !