पुणे आयुक्तालयाच्या भूमीच्या हस्तांतरणात माझा दुरान्वये संबंध नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

डावीकडून अजित पवार आणि निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर

मुंबई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – पुणे आयुक्तालयाच्या भूमीच्या हस्तांतरणाच्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्याविषयीच्या कोणत्याही कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी नाही. या जागेच्या हस्तांतरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन दिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे उपस्थित होते.

सौजन्य साम टीव्ही 

१. निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामध्ये वर्ष २०१० मध्ये पुणे आयुक्तालयाची येरवडा कारागृहाच्या ठिकाणची ३ एकर जागा एका खासगी विकासकाला देण्यासाठी पालकमंत्र्यांनी दबाव आणल्याचे म्हटले आहे. या कालावधीत अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे अजित पवार यांनी भूमी खासगी विकासकाला देण्यासाठी दबाव आणल्याच्या बातम्य प्रसिद्ध झाल्या.

२. त्यावर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले. या वेळी ते म्हणाले, ‘‘ज्या वेळी माझ्याकडे भूमीच्या हस्तांतरणाचा विषय आला, त्या वेळी भूमीच्या विक्रीमध्ये गृहविभागाचा लाभ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याची हस्तांतरणाची प्रक्रिया चालू करण्याची सूचना मी दिली; मात्र त्यानंतर मी विषय सोडून दिला. जनतेच्या विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो. ज्या भूमीविषयी आरोप होत आहेत, त्या भूमीची विक्री झालेली नाही. त्या भूमीची विक्री झाली असती, तर या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात अर्थ होता. सरकारची हानी होईल, असा निर्णय मी कधीही घेत नाही.’’