ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !

ब्रसेल्स (बेल्जियम) – युरोपमधील बेल्जियम देशाची राजधानी ब्रसेल्स येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले, तर १ जण घायाळ झाला आहे. ठार झालेले दोघेही स्विडनचे नागरिक होते. या घटनेच्या प्रकरणी बेल्जियमच्या पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. पोलीस गोळीबार करणार्‍यांचा शोध घेत आहेत. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याने व्हिडिओ प्रसारित करून या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे.

गोळीबार करणार्‍याने प्रसारित केला व्हिडिओ

या संदर्भात एका बंदुकधार्‍याने व्हिडिओ प्रसारित करून तो इस्लामिक स्टेटचा आतंकवादी असल्याचे सांगितले. व्हिडिओ तो प्रथम ‘अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) असे म्हणत सांगतो, ‘माझे नाव अब्देसालेम अल गुइलानी आहे. मी अल्लाचा एक सैनिक आहे. मी इस्लामिक स्टेटचा आहे. आमच्यावर प्रेम करणार्‍यांवर आम्ही प्रेम करतो, तर द्वेष करणार्‍यांचा द्वेष करतो. आम्ही आमच्या धर्मासाठी जगतो आणि मरतो. मी आतापर्यंत स्विडनच्या ३ नागरिकांना ठा मारले आहे. ज्या लोकांसमवेत मी वाईट केले असेल, तर त्यांनी मला क्षमा करावी. मीही सर्वांना क्षमा करतो.’

पोलिसांचे म्हणणे आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आणि या घटनेचा काही संबंध नाही. दुसरीकडे ब्रसेल्समधील नागरिकांना रात्रीच्या वेळी घरातच रहाण्यास सांगण्यात आले आहे.