गोवा : चित्रपटनगरीसाठी श्री भगवती पठारावरील भूमी देण्यास लोलये येथील ग्रामस्थांचा विरोध
काणकोण, १६ ऑक्टोबर (वार्ता.) : लोलये-पोळे कोमुनिदादच्या १५ ऑक्टोबरला झालेल्या आमसभेत चित्रपटनगरीसाठी मनोरंजन संस्थेला २५० एकर भूमी देण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. लोलये येथील श्री केशव देवालयाच्या सभागृहात खास आमसभा बोलावून हा निर्णय घेण्यात आला.
(सौजन्य : Prudent Media Goa)
लोलये येथील कोमुनिदादच्या मालकीच्या श्री भगवती पठारावरील भूमी चित्रपटनगरीसाठी निश्चित केल्याचे समजताच काही ज्येष्ठ नागरिकांनी याविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘श्री भगवती पठार हे संपूर्ण लोलये गावचे निसर्गरम्य असे धार्मिक स्थळ आहे. येथे श्री भगवतीमातेचे सुंदर मंदिर आहे. साक्षात् भगवतीमाता माशे, लोलये, पोळे या गावांचे रक्षण करत आहे, अशी आमची श्रद्धा आहे. या परिसरात चित्रपटनगरीला मान्यता देणे, म्हणजे एका अर्थी येथील पर्यावरणाचा र्हास करणे आणि या धार्मिक स्थळावर आघात करणेच होय ! येथील नैसर्गिक स्रोताला धक्का पोचल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही ज्येष्ठ नागरिक या प्रस्तावाला विरोध करणार आहोत.’’
सिटिझन्स कमिटी ऑफ लोलये या समितीनेही या चित्रपटनगरीला विरोध दर्शवला असून या समितीचे मनोज प्रभु गावकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘जसा येथे आयआयटीला आमच्या संघटनेने विरोध केला, त्याहीपेक्षा अधिक विरोध चित्रपटनगरीला करणार असून चित्रपटनगरीच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी येथील काही लोकांनी हा प्रयत्न चालवला असून याला सूज्ञ ग्रामस्थ बळी पडणार नाहीत. येथील पर्यावरण, वृक्ष-वेली, पक्षी, प्राणी आणि निसर्ग स्रोत यांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध न होता येथे अनैतिकता पसरेल अन् समाजविघातक गोष्टी होतील. त्यामुळे आम्ही चित्रपटनगरीला विरोध करणार आहोत.’’