श्री दुर्गामाता दौडमध्ये अनुचित प्रकार घडल्यास गुन्हे नोंद करणार ! – पोलीस उपअधीक्षक
वाई (जिल्हा सातारा), १६ ऑक्टोबर (वार्ता.) – वाई शहरात नवरात्रोत्सव आनंदाने साजरा केला जातो. दुर्गोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी. शहरामध्ये अनेक दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. या दुर्गामाता दौडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा आयोजकांवर गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली. (अशी चेतावणी अन्य पंथियांना दिली जाते का ? – संपादक)
ते पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सव मंडळांनी सामाजिक कार्याला महत्त्व द्यावे आणि आनंदाने उत्सव साजरा करावा. सामाजिक माध्यमांचा काळजीपूर्वक उपयोग करावा. या माध्यमातून कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी काळजी घ्यावी. डॉल्बी (मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा) न वाजवता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावी. नवरात्रीच्या निमित्ताने ४१ महिलांची एक दक्षता आणि शांतता समिती निर्माण करण्यात आली आहे.