नवरात्रीच्या काळात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यागांचे प्रक्षेपण देवद (पनवेल) येथील आश्रमात पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ३, ४ आणि ५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी याग करण्यात आले. सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात साधकांना या यागांचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण दाखवण्यात आले. हे प्रक्षेपण पहातांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. दिनांक ३.१०.२०२२
चंडीयागाच्या वेळी सौ. सायली करंदीकर यांनी म्हटलेली देवीची आरती ऐकतांना भावजागृती होऊन भावाश्रू अनावर होणे : ३.१०.२०२२ या दिवशी आश्रमात चंडीयाग झाला. त्यानंतर सौ. सायली करंदीकर या साधिकेने ‘जय अंबे गौरी’ ही देवीची आरती अतिशय भावपूर्ण रीतीने म्हटली. आरती म्हणतांना त्यांचा देवीप्रतीचा उत्कट भाव जाणवत होता. पार्श्वसंगीत नसतांनाही ही आरती पुष्कळ मधुर वाटत होती. सौ. सायली यांच्यात असलेल्या शरणागतभावामुळे असे वाटत होते. आरती ऐकतांना माझा देवीप्रतीचा भाव जागृत होऊन मला भावाश्रू अनावर झाले. तेव्हा मला ‘आरती संपू नये आणि त्यांच्या आवाजातील गोडवा ऐकत रहावा’, असे वाटत होते.
२. दिनांक ४.१०.२०२२
रामनाथी आश्रमात चालू असलेल्या चामुंडादेवीच्या यज्ञात अत्तराची आहुती दिल्यावर साधिकेला देवद (पनवेल) आश्रमात दैवी सुगंध येणे : ४.१०.२०२२ या दिवशी संध्याकाळी रामनाथी आश्रमात चामुंडादेवीसाठी यज्ञ चालू होता. त्या वेळी यज्ञात मारवा अत्तराची आहुती देण्यात आली. देवद, पनवेल येथील आश्रमात बसून यज्ञाचे प्रक्षेपण पहातांना मला क्षणभर दैवी सुगंध आला.
३. दिनांक ५.१०.२०२२
यागाच्या वेळी ललिता त्रिपुरसुंदरीदेवीचा नामजप करतांना ‘देवीच्या चरणी मोगर्याची फुले वहात आहे’, असा भाव ठेवण्याचा विचार येणे आणि सूत्रसंचालकानेही तसे सांगणे : दसर्याच्या, म्हणजे ५.१०.२०२२ या दिवशी ललिता त्रिपुरसुंदरीदेवीचा याग होता. यज्ञात आहुती चालू होण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला, ‘प्रत्येक आहुतीच्या वेळी देवीच्या चरणी नामजपासहित ओंजळभर मोगर्याची सुगंधी फुले अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवूया.’ त्यानंतर काही वेळातच सूत्रसंचालन करणार्या साधकाने देवीचा नामजप करतांना ‘साधकांनी देवीच्या चरणी फुले अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा’, असे सांगितले. ते ऐकून ‘जणू देवीनेच मला आधी पूर्वसूचना दिली होती’, असे वाटले.
४. देवीची आरती करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चेहर्यावर देवीप्रती उत्कट भाव जाणवणे
३, ४ आणि ५.१०.२०२२ या तिन्ही दिवशी देवीची आरती करतांना मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चेहर्यावर देवीप्रतीचा उत्कट भाव जाणवत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये देवीच्या प्रती पुष्कळ प्रीती जाणवत होती. ‘त्या देवीशी मनातून बोलत आहेत आणि देवीची भरभरून स्तुती करत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘त्या आता साधकांशीही काहीतरी बोलतील’, असे मला वाटले. ‘त्यांचे ओठ हलत आहेत’, असे वाटून मी त्यांच्याकडे एकटक पहात राहिले. त्यांच्याकडे पाहून माझाही देवीप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला. मला त्यांच्याकडे पाहून ‘आरती करतांना आर्तता कशी असायला हवी ?’ हे शिकायला मिळाले.
‘मला या यज्ञाचा लाभ घेता आला आणि मला या अनुभूतीही दिल्या’, याबद्दल मी देवी, महर्षि आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |