उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या २ अधिकारी निलंबित आणि त्यांना अटक !
समृद्धी महामार्गावरील अपघाताला उपप्रादेशिक परिवहन विभागच उत्तरदायी !
छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे २ अधिकारी उत्तरदायी असल्याचे निदर्शनास आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गणोरकर असे या निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागात ते साहाय्यक अधिकारी पदावर कार्यरत होते.
वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावर १४ ऑक्टोबरच्या रात्री जांबर गावाजवळ उभ्या ट्रकला खासगी बस धडकून झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर २० प्रवासी घायाळ झाले होते. त्यानंतर या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर नोंद घेऊन त्याची चौकशी आणि अन्वेषण करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.