नवरात्रोत्सवानिमित्त पुणे येथे प्रमुख मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत पालट !
पुणे – शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुःशृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानीमाता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले की,
१. १५ ऑक्टोबरपासून आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक चालू रहाणार आहे.
२. लक्ष्मी रस्त्यावरील गणपति चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद रहाणार आहे. दैनिक ‘सकाळ’ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांसाठी बंद रहाणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई आहे.
३. शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई आहे.
४. सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतुःशृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.