राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’; मात्र मुख्य शहर असणार्या मुंबईतीलच दादर रेल्वेस्थानक अस्वच्छ !
मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर १ ऑक्टोबर या दिवशी ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तसेच राज्यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. असे असतांना महाराष्ट्रातील मुख्य शहर आणि त्यात मुख्य रेल्वेस्थानक असलेल्या दादर रेल्वेस्थानकावर मात्र सर्वत्र अस्वच्छता आहे. कचराकुंडी असल्याप्रमाणे दादर रेल्वेस्थानकावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे मुंबईत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ किती गांभीर्याने राबवली जात आहे ? याकडेही गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
अशी झाली आहे दादर रेल्वेस्थानकाची दुरवस्था !
१. दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंच्या जिन्यांवर कचरा साचला आहे.
२. दादर रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी कैलास लस्सी येथून पूर्व भागातून पश्चिमेकडे जाणार्या रेल्वस्थानकांवरील मार्गावर बसणारे फेरीवाले हे भाजीपाला, पिशव्या आदी सर्व कचरा तेथेच टाकतात.
३. मागील अनेक मासांपासून हा प्रकार चालू आहे; मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. विक्रेत्यांना शिस्त लावण्यात येत नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर दिवसभर हा कचरा पडून असतो. रेल्वेस्थानकाच्या काही भागांत कचराकुंडी नसल्यामुळे कचरा साचलेला आहे.
४. रेल्वेस्थानकावर परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी सूचना लावण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र यावर कार्यवाही होतांना दिसत नाही.