भक्ताच्या हाकेला तत्क्षणी धावून येऊन त्याच्या संकटाचे निवारण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘२४.२.२०२३ या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही उभयता (पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या व्यष्टी संत, वय ७४ वर्षे) आणि पू. सदाशिव परांजपे (सनातनचे ८९ वे व्यष्टी संत, वय ८० वर्षे)) सकाळी १०.३० वाजता घरून निघून रामनाथी आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर मी खोलीतच बसून समष्टीसाठी असलेला नामजप करते. आम्ही आश्रमात आल्यावर माझी ज्येष्ठ कन्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्या मला म्हणाल्या, ‘‘आई, मला एक अडचण आली आहे. त्याचे निवारण होण्यासाठी तू आता लगेच नामजप करायला बसशील का ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘हो. लगेच बसते.’’ त्या वेळी नामजप करतांना मला झालेला त्रास आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी नामजप करतांना माशीच्या माध्यमातून त्रास होऊन अर्धा घंटा एकाग्रतेने नामजप करता न येणे

मी नेहमी आश्रमातील खोलीत नामजप करतांना खिडकीपाशी बसते. त्याप्रमाणे मी खिडकीपाशी बसले आणि प्रार्थना करून नामजप करायला आरंभ केला. नामजपाला आरंभ केल्यावर ५ मिनिटांतच एक माशी माझा हात, पाय आणि चेहरा यांवर बसून मला सारखा त्रास देऊ लागली. त्यामुळे माझा एक मिनिटही एकाग्रतेने नामजप होत नव्हता. माशी हाकलण्यात माझा वेळ जात होता आणि लक्ष विचलित होत होते. त्यामुळे मी अगदी वैतागून गेले. माशीरूपी वाईट शक्तीचा माझ्यावर पगडा असल्यामुळे ‘मला काय करावे ?’, ते सुचत नव्हते. यातच अर्धा घंटा वेळ वाया गेला. हा नामजप व्यवस्थित केल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीताईंची अडचण सुटणार होती; म्हणून ती माशी मला नामजप करू देत नव्हती. त्या माशीला हाकलण्यासाठी मी रागाने माझाच हात, पाय आणि चेहरा यांवर मारत होते; पण ती माशी माझी पाठ सोडत नव्हती.

२. माशीचा त्रास दूर होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेने त्यांना आर्तनेने प्रार्थना करायला सुचणे

अर्ध्या घंट्याने मी सहज डोळे उघडले आणि गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुमच्या अगाध कृपेमुळे माझे लक्ष पटलावर ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथाकडे गेले. त्यावर असलेल्या तुमच्या छायाचित्राकडे पाहून मला तुम्हाला प्रार्थना करायचे सुचले. मी तुम्हाला प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, तुमचे लाडके लेकरू श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीताई यांना काहीतरी अडचण आली आहे. त्यासाठी त्यांनी मला नामजप करायला सांगितला आहे; पण ही माशी मला नामजप करू देत नाही. गुरुदेवा, ‘आता कसे करायचे ?’, ते तुम्हीच पहा. या माशीरूपी वाईट शक्तीचा बंदोबस्त करायचे तुमच्याच हातात आहे.’ प्रार्थना करतांना माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर २ मिनिटांत माशी नाहीशी होऊन पुढील अर्धा घंटा एकाग्रतेने नामजप होणे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची अडचण सुटणे 

गुरुदेवा, तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत. तुम्हाला प्रार्थना केल्यावर २ मिनिटांतच ती माशी एकदम नाहीशी झाली आणि तुमच्या कृपेने पुढील अर्धा घंटा माझा नामजप एकाग्रतेने झाला. तुमची ही अगाध कृपा अनुभवतांना भावाश्रूंनी माझे डोळे पाझरू लागले. तेवढ्यात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजलीताईंचा भ्रमणभाष आला आणि त्या म्हणाल्या, ‘‘आई, नामजप थांबव. अडचण सुटली.’’

४. मरून पडलेल्या माशीकडे पाहून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माशीच्या रूपात आलेल्या वाईट शक्तीला आश्रमासारख्या सात्त्विक ठिकाणी देवाघरी पाठवून तिला चांगली गती दिली’, असे वाटणे

नामजप झाल्यावर मी उठले. माझे लक्ष सहजच समोरच्या खिडकीकडे गेले. ती माशी पडद्याच्या मागे खिडकीच्या जाळीवर निवांत बसली होती. मला तिचा राग आला आणि मी तो पडदा माशीच्या दिशेने खिडकीकडे सरकवला. तेव्हा ती माशी तिथेच मरून पडली. ते पाहून मला वाटले, ‘गुरुदेवा, तुम्ही भक्ताच्या (माझ्या) हाकेला क्षणात धावून आला आणि माशीच्या रूपातील वाईट शक्तीला आश्रमासारख्या सात्त्विक ठिकाणी देवाघरी पाठवले. तिला आश्रमरूपी भूवैकुंठात चांगली गती दिली. श्रीरामाने रावण आणि श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल यांसारख्या दुष्टांचा संहार करून त्यांना चांगली गती दिली. त्याप्रमाणे तुम्ही हे कार्य केले.’

क्षणोक्षणी आम्हा साधकांच्या पाठीशी उभे राहून आमचे रक्षण करणार्‍या गुरुदेवा, आम्ही तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.’

– (पू.) सौ. शैलजा परांजपे, फोंडा, गोवा. (१.३.२०२३)