चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपूल ‘लाँचर’च्या यंत्रणेसह कोसळला !
याच पुलाची घडली दुसरी दुर्घटना !
चिपळूण, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरातील बहादूरशेख नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम चालू असतांना पुलाचा ‘गर्डर’ तुटल्याने ‘लाँचर’च्या यंत्रणेसह पूल कोसळला. यामुळे झालेल्या मोठा आवाजामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. या दुर्घटनेच्या परिसरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली आहे; मात्र या दुर्घटनेमुळे याच उड्डाणपुलावर गर्डर तुटण्याची ही दुसर्यांदा घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांची रांग लागली. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्तात हळूहळू वाहने सोडली जात आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वांत मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ कि.मी. इतकी या पुलाची लांबी आहे. यासाठी ४६ ‘पिलर’ उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या ‘पिलर’चे काम पूर्ण झाल्यानंतर बहादूरशेख येथून पिलरवर ‘गर्डर’ चढवण्याचे काम चालू आहे. १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता नव्याने चढवलेले ‘गर्डर’ या पुलाचे काम चालू असतांनाच खचले होते. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता ‘गर्डर’ उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या ‘लाँचर’सह पूल कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा आणि आमदार शेखर निकम घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेच्या वेळी पुलाजवळ एकही अधिकारी उपस्थित नव्हता. तेथे ‘सेफ्टी इंजिनीयर’ आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला या दुर्घटनेबाबत जाब विचारला. या उड्डाणपुलाचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
या पुलाविषयी घडली दुसर्यांदा दुर्घटना !
ऑगस्टमध्ये याच उड्डाणपुलाचा गर्डर लाँचर तुटला होता. या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती; मात्र अधिक असलेल्या वजनामुळे गर्डर लाँचर खाली कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्या वेळी गर्डरला आणि पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतरही ही दुर्घटना घडली आहे.
संपादकीय भूमिका
|