कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिपदेला सिंहासनारूढ रूपातील पूजा !

विश्वाची सार्वभौम सत्ताधीश असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीची सिंहासनारूढ रूपात बांधलेली विलोभनीय पूजा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सिंहासनारूढ रूपातील पूजा प्रतिपदेला बांधण्यात आली होती. सिंहासनामध्ये सिंहाचा मुखवटा, पाय यांच्या आकारांचा अंतर्भाव असतो. सिंह हे शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य आणि सत्ता यांचे प्रतीक आहे. सिंहासनावर विराजमान होणारे देव आणि राजे हे सार्वभौमत्व दर्शवतात. ‘श्री महालक्ष्मी ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश आहे’, अशी श्रद्धा असल्यामुळेच सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली.

या पूजेमध्ये श्री महालक्ष्मी राजराजेश्वरी या स्वरूपात भक्तांना मनोवांच्छित फल प्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान आहे. अत्यंत वैभवशाली आणि प्रसन्न असे हे देवीचे रूप द्विभुज आहे. उजव्या हाताने ती आशीर्वाद आणि अभय देत आहे, तर डाव्या हातात कमळ आहे. कमळ हे सौंदर्य, ज्ञान आणि पावित्र्य यांचे प्रतीक आहे.

मार्कंडेय पुराणात श्री दुर्गा सप्तशतीच्या ११ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक ५५ मध्ये ज्या ज्या वेळी दानवांकडून उपद्रव होईल, त्या त्या वेळी मी अवतार घेऊन शत्रू संहार करीन (दानवांचा संहार करीन), धर्मपालनास उपद्रव होऊ नये; म्हणून अशा आसुरी शक्तींचा नि:पात करीन, याप्रमाणे देवीने वचन आहे. देवीने सांगितले आहे, ‘भक्तजनहो, मी तुमच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी सदैव तत्पर राहीन.’ ही पूजा श्रीपूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली होती.

श्री जोतिबा देवाची राजदरबारी राजेशाही थाठातील बांधलेली बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा

श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान येथेही नवरात्र प्रारंभ झाले. तेथे श्री जोतिबा देवाची राजदरबारी राजेशाही थाटातील बांधलेली बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.