कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ !
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिर उघडले आणि त्यानंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे, तसेच भाविकांची ऊन, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी यंदा शेतकरी संघाची इमारत दर्शन रांगेसाठी घेण्यात आली आहे. मंदिराबाहेरील रांगेसाठी भव्य मंडप घालण्यात आला असून आत पंखेही लावण्यात आले आहेत. विविध प्रवेशद्वारांतून प्रवेश करणार्या भाविकांसाठी स्वतंत्र अशी चप्पल व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात उद्यान आणि मंदिराबाहेर अशी २ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘व्हाईट आर्मी’चे ५० हून अधिक स्वयंसेवक भाविकांची सुरक्षा, तसेच गर्दी आणि अन्य सुरक्षेची कारणे यांसाठी तैनात करण्यात आले आहेत. मंदिराबाहेर पोलिसांचा विशेष कक्ष कार्यरत असून सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देऊन पहाणी करत आहेत.