एशियाड क्रीडा स्पर्धांतील भारताचे उज्ज्वल यश !
पंतप्रधान मोदी यांचे शासन आल्यावर प्रत्येक क्षेत्राप्रमाणे खेळाच्या क्षेत्रातही काही पालट झाले. त्याचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणार्या यशामध्ये दिसत आहे. त्याविषयी थोडक्यात पाहूया.
भारतीय खेळाडूंना प्रथमच मोठ्या प्रमाणात आंतररराष्ट्रीय स्तरावरील पदके मिळण्याची कारणे !
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय चमूने मिळवलेले यश अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल ! याला कारण केंद्र सरकारने मागील काही वर्षांपूर्वीपासून नियोजनबद्ध केलेले प्रयत्न आहेत ! काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ‘जागतिक क्रीडा स्पर्धा म्हणजे मंत्र्यांच्या, केंद्रीय अधिकार्यांचे गणगोत, नातेवाइक यांना परदेशवारी करण्याची संधी’, असे होते. या वशिलेबाजीला बाजूला सारून आताच्या सरकारने केवळ गुणवत्तेवर खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांची निवड केली. जेथे आवश्यकता आहे, तेथे देशी, परदेशी प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण दिले. आवश्यकता पडल्यास भारतीय खेळाडूंना परदेशी पाठवून दिलेले गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले. त्यासमवेतच मागील काही वर्षांपासून खेळाडूंनीही प्रचंड मेहनत घेतली. ‘चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या देशातील खेळाडूंसमोर आपण चांगल्या प्रकारे लढत देऊन पदक मिळवू शकतो’, अशा रितीने पद्धतशीर सकारात्मक मानसिकता निर्माण करून मनोबल वाढवले. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी या वर्षीच्या एशियाडमध्ये १०७ पदकांची पुष्कळ मोठी कमाई केली आहे ! भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी ‘आपकी बार सौ पार’चा (या वेळी १०० पेक्षा अधिक पदके) नारा दिला होता ! त्यासमवेच केंद्रानेही या वर्षीच्या ‘चीन एशियाड’मध्ये १०० पदकांपेक्षा अधिक पदकांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले होते ! ते लक्ष्य भारतीय चमूने साध्य करून या स्पर्धांमध्ये आपला पुष्कळ मोठा दरारा निर्माण केला आहे.
पंतप्रधानांचे ‘लक्ष्य’ साध्य !
४६ पदके महिलांनी आणि ४८ पदके पुरुषांनी जिंकली आहेत, तर ९ मिश्र प्रकारांत आणि लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे नेमबाजी आणि अॅथलेटिक्समध्ये जवळपास ४८ पदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केली. त्यासमवेत २२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये पदके मिळवून या पुढील ऑलिंपिकमध्ये आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. या संदर्भात स्वतः पंतप्रधानांनी या स्पर्धांमध्ये घातलेले वैयक्तिक लक्ष आणि वेळोवेळी खेळाडूंशी साधलेला संवाद, त्यांचे केलेले अभिनंदन, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये खेळाडूंच्या केलेल्या नियुक्त्या, त्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा सुटलेला प्रश्न अन् स्पर्धेची सिद्धता करण्यासाठी मिळालेला अधिकचा वेळ यांचाही परिणाम खेळाडूंना या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या यशावर निश्चितपणे झाला आहे !
कधी नव्हे, ते भारताने पदकांची शंभरी पार केलेली आहे. ‘The height of your success determine the depth of your struggle’ (तुमच्या यशाची उंची तुमच्या संघर्षाची खोली ठरवते.), या उक्तीप्रमाणे खेळाडूंनीही पदके मिळवण्यासाठी मागील काही वर्षांपासून मैदानावर किती आणि कशी अंगमेहनत घेतली असेल, हे पदकांच्या तालिकेवरून आपणास समजून येते. या मिळवलेल्या पदकांमुळे पुढील वर्षीच्या ऑलिंपिकसाठी फ्रान्सला जातांना भारतीय खेळाडूंचे मनोबल आणि जिंकण्याची इच्छा नक्कीच वाढलेली असेल आणि त्या स्पर्धेमध्येही आपले खेळाडू पुष्कळ मोठ्या प्रमाणावर पदके जिंकतील, याविषयी देशवासियांच्या मनात शंका नाही !
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे.