चौकशी समितीकडून पुणे येथील ‘ससून’च्या व्यवस्थापनाची चौकशी !
ललित पाटील पलायन प्रकरण
पुणे – येथील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पसार झाल्याप्रकरणी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची नेमलेल्या चौकशी समितीने सखोल चौकशी केली. तसेच वर्ष २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयामध्ये प्रविष्ट झालेल्या प्रत्येक बंदीवान रुग्णाची माहिती समितीने मागितली आहे. या समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तर सदस्य म्हणून सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार हे आहेत. समितीने लेखी अहवाल देण्यास सांगितले आहे. वर्ष २०२० पासून आलेले बंदीवान रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयामध्ये दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे आधुनिक वैद्य आदी माहितीचा त्यात समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.