अजित पवार यांच्याकडून सरकारी जागा खासगी विकासकाला देण्याचा आग्रह !
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा आरोप !
मुंबई – माजी भारतीय पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी ‘अजित पवार यांनी येरवडा कारागृहाच्या शेजारी असलेली पोलीस आयुक्तालयाच्या मालकीची ३ एकर भूमी एका खासगी विकासकाला देण्याचा आग्रह धरला होता’, असा गंभीर आरोप केला आहे. बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामध्ये याविषयी लिहिले आहे. या जागेवर पोलिसांसाठी कार्यालय होणार होते, असे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले आहे.
ही घटना वर्ष २०१० मधील आहे. या वेळी मीरा बोरवणकर या पुणे पोलीस आयुक्तपदी होत्या, तर अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. पुस्तकात उल्लेख करतांना त्यांनी जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा उल्लेख केला आहे.
पुस्तकात करण्यात आलेला आरोप !
पुणे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक दिवस विभागीय आयुक्तांनी मला पालकमंत्र्यांनी भेटण्यासाठी बोलावले असल्याचे सांगितले. मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसराचा नकाशा होता. या जागेचा लिलाव झाला असून अधिक बोली लावणार्यांसमवेत भूमी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यास त्यांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना ‘येरवडा पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी असून भविष्यात इतकी मोक्याची जागा पुन्हा मिळणार नाही, तसेच पोलीस वसाहतीसाठी आपल्याला जागेची आवश्यकता आहे. आयुक्तपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारलेला असतांना सरकारी भूमी खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या दृष्टीने बघितले जाईल’, असे सांगितले. त्यानंतरही मंत्र्याने माझे काहीही ऐकले नाही आणि भूमी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला.