प्रकाश प्रक्षेपित करणार्या ‘ज्योतीफूल’ नावाच्या दैवी वनस्पतीची माहिती आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘ज्योतीफुला’च्या संदर्भात आलेली अनुभूती
१. महर्षि वशिष्ठ यांनी नाडीवाचनातून कोळ्ळीमलई पर्वतावर ३ दिवस रहायला जाण्यास सांगणे
‘११.१.२०२१ या दिवशी झालेल्या नाडीवाचनात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून वशिष्ठ महर्षींनी सांगितले, ‘पुढचे तीन दिवस तुम्हाला कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन रहायचे आहे; कारण तो सिद्धांनी तप केलेला पर्वत आहे आणि तेथे अनेक दैवी वनस्पती आहेत.’
२. प्रकाश देणारी दैवी वनस्पती ‘ज्योतीफूल’ !
२ अ. दैवी वनस्पतींच्या एका अभ्यासकाने ‘कोळ्ळीमलई पर्वतावर ‘ज्योतीफूल’ नावाची प्रकाश प्रक्षेपित करणारी दैवी वनस्पती असून तिचे मूळ आणि अग्रभाग यांत प्रकाश दडलेला असतो’, असे सांगणे : आम्ही कोळ्ळीमलई पर्वतावर गेलो. तेव्हा तेथे आम्हाला एक व्यक्ती भेटली. या व्यक्तीचा दैवी वनस्पतींचा अभ्यास आहे. तिला हे ज्ञान परंपरेने मिळाले आहे. तिला तिचे वडील आणि आजोबा यांच्याकडून हा दैवी वारसा प्राप्त झाला आहे. तिने आम्हाला सांगितले, ‘‘या सिद्धांच्या तपोक्षेत्रात ‘ज्योतीफूल’ नावाची एक दैवी वनस्पती आहे. तिच्यातून प्रकाश बाहेर पडतो. हे एक प्रकारचे गवत आहे. या गवताचे मूळ आणि अग्रभाग यांत प्रकाश दडलेला असतो.’’
२ आ. ‘ज्योतीफूल’ या वाळलेल्या वनस्पतीवर पाणी शिंपडल्यावर तिच्यातून प्रकाश बाहेर पडत असणे आणि पूर्वी प्रकाशाची आवश्यकता भासल्यावर ऋषिमुनींनी या वनस्पतीच्या साहाय्याने अंधारातून वाट काढणे : पूर्वी एका नाडीवाचकाने आम्हाला सांगितले होते, ‘‘पूर्वीच्या काळी विजेर्या (बॅटर्या) नव्हत्या. त्या वेळी ऋषिमुनी वनातून अंधारातून वाट काढण्यासाठी या गवताचा उपयोग करायचे. पाण्याचा कमंडलू आणि हे ‘ज्योतीफुला’चे वाळलेले गवत घेऊन ते वनातून मैलो न् मैल प्रवास करायचे. त्यांना ज्या वेळी प्रकाशाची आवश्यकता भासे, त्या वेळी ते कमंडलूतील पाणी या ‘ज्योतीफुला’च्या वाळलेल्या गवतावर शिंपडत. त्या वेळी त्यातून प्रकाश बाहेर पडण्यास आरंभ होत असे.’’ पूर्वीच्या काळी ‘ऋषिमुनींना वनस्पतींचे किती ज्ञान होते !’, हे यातून लक्षात येते.
२ इ. अनुभूती
२ इ १. ‘ज्योतीफूल’ या दैवी वनस्पतीचे दर्शन होणे, त्याच वेळी २ दिवस ढगाआड लपलेला सूर्य बाहेर येऊन त्याचा प्रकाश या वनस्पतीवर पडणे : आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो, त्या ठिकाणी पाऊस, वारा आणि धुके यांमुळे आम्हाला २ दिवस सूर्यदर्शन झाले नव्हते. त्या अभ्यासकाने आम्हाला वनातील प्रत्यक्ष ‘ज्योतीफुला’चे गवत दाखवले. त्या वेळी अकस्मात् ढगातून सूर्य बाहेर आला आणि त्याचे ऊन या वनस्पतीवर पडले. आम्हाला हा मोठा दैवी चमत्कार वाटला. भूतलावरील प्रकाशाला आकाशातील प्रकाशाने स्पर्श केलेला पाहून आमचे डोळे भरून आले आणि आम्ही या दैवी गवताला कृतज्ञतेने नमस्कार केला.
३. आध्यात्मिक शक्तीमुळे भारतात अनेक दैवी वनस्पती असणे; मात्र काळाच्या ओघात त्या नष्ट होत चालल्या असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असणे
भारताला आध्यात्मिक भूमी म्हटले जाते. भारतात अशा अनेक दैवी वनस्पती आहेत; परंतु काळाच्या ओघात त्या आता नष्ट होत आहेत. ‘त्यांचे संवर्धन करणे आणि त्यांची माहिती मानवजातीला देणे’ अत्यंत आवश्यक आहे. अशा वनस्पतींची माहिती असणार्या माणसांकडून आपण हे ज्ञान घेऊन किमान ते शब्दरूपात तरी सर्वांना दिले पाहिजे.
४. प्रार्थना
हे कार्य सनातन संस्थेचे साधक एक सेवा म्हणून करत आहेत. ‘सृष्टीत दडलेले अनंत प्रकारचे ज्ञान गोळा करण्यासाठी देवाने आम्हाला शक्ती आणि बुद्धी द्यावी’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१५.१.२०२१)
धारिका टंकलेखन करत असतांना झालेला त्रास
‘या धारिकेचे टंकलेखन करत असतांना अगदी धारिका पूर्ण होत आली होती आणि त्याच वेळी माझ्या डोळ्यांसमोर धारिकेतील माहिती अकस्मात् पुसली गेली. यावरून ‘पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींना असे दैवी शब्दज्ञान लोकांसमोर यायला नको आहे; म्हणून त्यांनी हा अडथळा आणला आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी पुनश्च नव्याने धारिकेचे टंकलेखन केले.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१५.१.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |