सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या महिला डॉक्टरला अटक !
|
यवतमाळ – उमरखेड येथे एका शाळेत इयत्ता ५ वीत शिकणार्या मुलीला दुचाकीवर शाळेत सोडण्याच्या निमित्ताने बाहेर नेऊन गुन्हेगाराने तिच्यावर अत्याचार केला. मुंबईतील डॉ. सायली शिंदे यांना पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. शिंदे यांनी बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘लैंगिक अत्याचारग्रस्त कुठल्याही पीडित बालिकेचे अथवा महिलेचे नाव पुढे येणार नाही अथवा कुणी त्यांची ओळख उघड करू नये’, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. असे असतांना डॉ. सायली शिंदे यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पीडित बालिकेची भेटीच्या काळातील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुसद न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.