शारीरिक त्रासातही सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
देवरुख – दुर्धर आजार आणि शारीरिक त्रास असतांनाही अंतर्मनाने साधना करणारे देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. श्री. मोरे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी येथील एका कार्यक्रमात दिली. सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन श्री. मोरे यांचा सत्कार केला. या वेळी मोरे कुटुंबीय, जिल्हासेवक श्री. महेंद्र चाळके आणि अन्य साधक उपस्थित होते.
कुटुंबियांना जाणवलेली श्री. मोरे यांची गुणवैशिष्ट्ये !
१. सौ. सुषमा हनुमंत मोरे (पत्नी)
केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच दुर्धर आजारातून ते वाचले. आम्ही आशा सोडली होती. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून आध्यात्मिक स्तरावरील उपाय आम्ही नियमित केले. गुरुदेवांनी आमच्यावर कृपा केली आहे. मी त्यांच्यासाठी भ्रमणभाषवर महाशून्य हा नामजप लावून देत असे. त्यामध्ये खंड पडला, तर ते मला त्याची जाणीव करून देत असत. भक्तीसत्संग ते तल्लीन होऊन ऐकतात.
२. श्री. प्रथमेश मोरे (मुलगा)
बाबांनी एवढी वर्षे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केली त्याचे आज फळ मिळाले. बाबा रुग्णालयामध्ये असतांना ३० दिवस बेशुद्ध होते. त्या वेळी तेथील वैद्यांनी ‘आम्ही ५० टक्केच खात्री देऊ शकतो. पुढे देवाच्या हातात आहे.’, असे सांगितले होते. त्या वेळी आम्ही रुग्णालयामध्येही नामजपादी उपाय करत होतो. बाबा वितरण करत असलेले दैनिक मी प्रत्येक रविवारी वितरण करतो. एखाद्या रविवारी पावसामुळे मी ‘आज दैनिक वितरणाला जात नाही’, असे म्हटले, तर ते लगेचच हातानी खूण करून ‘आजची सेवा आजच पूर्ण करायला हवी’, असे सांगतात.
३. सौ. राधा प्रथमेश मोरे (सून)
बाबा घरातील सेवा असो कि सनातनच्या सेवा असो, त्यांच्यामध्ये नीटनेटकेपणा आणि शिस्त आहे, तसेच त्यांची गुरुकार्यावर श्रद्धाही आहे. त्यांची ६१ टक्के पातळी झाल्याचे ऐकून मलाही पुष्कळ आनंद झाला.