कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !
पंचायतीच्या भूमीवर अतिक्रमण करणार्यांनी मूर्तीची तोडफोड केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
कर्नाल (हरियाणा) : येथील शामगड गावात अज्ञातांनी श्री हनुमानाची मूर्तीची तोडफोड केली. ही मूर्ती पंचायतीच्या भूमीवर स्थापन करण्यात आली होती. मूर्तीची तोडफोड केल्यानंतर तिचे अवशेष येथील तलावात फेकण्यात आले. या घटनेनंतर येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी २ घंटे येथे शोधमोहीम राबवली, तसेच तलावातून मूर्तीचे अवशेष बाहेर काढले. पोलीस उप अधीक्षक सोनू नरवाल यांनी सांगितले की, गावकर्यांनी दुसर्या गटावर मूर्तीची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचे अन्वेषण करत आहेत. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.
(सौजन्य : Karnal Breaking News)
गावकर्यांचे म्हणणे आहे की, पंचायतीच्या ज्या भूमीवर मूर्ती स्थापन करण्यात आली, तिच्यावर अन्य गटाने अतिक्रमण केले आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मूर्ती स्थापन केल्यामुळे या गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यांनी मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली होती. त्या गटानेच मूर्तीची तोडफोड केल्याची शक्यता आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिका
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |