‘पी.एफ्.आय.’च्या नावाखाली सरकार इतर मुसलमान संघटनांचा छळ करत आहे ! – झियाओद्दीन सिद्दीकी, अध्यक्ष, वहदते इस्लामी हिंद
छत्रपती संभाजीनगर – मागील काही दिवसांत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) देशातील बंदी घातलेल्या पी.एफ्.आय. या संघटनेच्या संदर्भात २० ठिकाणी धाडी घातल्या. ‘एन्.आय ए.’ने ‘पी.एफ्.आय.’च्या नावाखाली ‘वहदते इस्लामी हिंद’चे नियतकालिक मासिक ‘वहदते जदीद’च्या देहलीसह इतर राज्यांतील कार्यकर्ते रहात असलेल्या घरांची झाडाझडती घेतली. ‘पी.एफ्.आय.’च्या नावाखाली सरकार इतर मुसलमान संघटनांचा छळ करत असून हा छळ खपवून घेणार नाही, अशी चेतावणी ‘वहदते इस्लामी हिंद’ संघटनेचे अध्यक्ष झियाओद्दीन सिद्दीकी यांनी १४ ऑक्टोबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (एन्.आय.ए. किंवा अन्य अन्वेषण यंत्रणांना चेतावणी देणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशा संघटनांवर बंदीच हवी ! – संपादक)
ते पुढे म्हणाले की, ‘वहदते इस्लामी हिंद’ ही एक इस्लामी वैचारिक संघटना आहे. या संघटनेचे उपक्रम देशाच्या १६ राज्यांत राबवले जातात. ज्या तक्रारींच्या आधारावर हिंदुस्थानात आमच्या संस्थेवर निशाणा साधण्यात येत आहे, त्याच्याशी ‘वहदते इस्लामी हिंद’चा काहीही संबंध नाही. ‘पी.एफ्.आय.’च्या नावाखाली आमच्या कार्यकर्त्यांच्या घरांची झडती का घेण्यात येत आहे ? आमची संस्था अन्वेषण कार्यात नेहमी सहकार्य करेल; मात्र अवमान आणि अपकीर्ती सहन केली जाऊ शकत नाही.