गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील वसाहत रुग्णालयातील रुग्णांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत ! – राजू यादव

वैद्यकीय अधीक्षक विद्या पॉल (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना राजू यादव, तसेच अन्य कार्यकर्ते

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – येथील वसाहत रुग्णालयात गरीब रुग्णांना रक्तदाबाच्या गोळ्या मिळत नाहीत. काही आधुनिक वैद्य आणि परिचारिका उपचारासाठी येणार्‍या रुग्णांशी उद्धट बोलून त्यांना बाहेर काढण्याचे प्रकार रुग्णालयात होत आहेत. अधीक्षकच वेळेत येत नसल्याने प्रशासनावर वचक नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. जर गरीब रुग्णांवरच उपचार होणार नसेल, तर रुग्णालयाचा उपयोग काय ? तरी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात येणार्‍या सर्व रुग्णांवर योग्य आणि वेळेत उपचार व्हावेत, या मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक विद्या पॉल यांना दिले.

निवेदन स्वीकारल्यावर वैद्यकीय अधीक्षक विद्या पॉल यांनी ‘यापुढे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार करू’, असे आश्वासन दिले. या प्रसंगी विक्रम चौगुले, योगेश लोहार, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक धिंग यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन त्यावर स्वत:हून उपाययोजना का काढत नाही ?