मिरज येथे आजपासून श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवास प्रारंभ !

मिरज (जिल्हा सांगली), १४ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील ब्राह्मणपुरीमधील ऐतिहासिक पुरातन श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात १५ ऑक्टोबरपासून श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवास प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत शास्त्रीय गायन, सतारवादन आणि पुरस्कार वितरण, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाने केले आहे.

१५ ऑक्टोबरपासून प्रतिदिन सकाळी ६.३० वाजता मंगलवाद्ये, श्री. दिलीप मुळे आणि त्यांचे सहकारी यांचे सनईवादन, तसेच देवीस सकाळी ७ वाजता अभिषेक अन् महापूजा होणार आहे. सकाळी ८ वाजता श्री. देशपांडे (चंदूरकर) यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी ७ वाजता अभिषेक आणि महापूजा होईल. रात्री ९.३० वाजता श्री. बजरंग मोहिते यांचे श्री देवीचे स्तवन, तसेच देवीची पालखी, आरती आणि मंत्रपुष्प सोहळा होणार आहे.