नवी मुंबई येथून खजूर, खारीक आणि लवंग यांचा ७ कोटी २५ लाखांचा भेसळीचा साठा जप्त !

ठाणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – नवी मुंबई येथील महापे औद्योगिक वसाहत भागातील ‘टीटीसी इंडस्ट्रियल एरियामधील क्रिसेंट कोल्डस्टोरेज’ या आस्थापनामध्ये धाड घालून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने १ कोटी ७२ लाख ६२ सहस्र रुपयांचा ९५ सहस्र ३४ किलोंचा खजूर आणि खारीक यांचा साठा, तसेच तुर्भे भागातून ५ कोटी ५५ लाख ६ सहस्र ८५० रुपयांचा लवंगाचा साठा, असा एकूण ७ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे. अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. (वेळोवेळी तपासणी आणि कारवाई झाल्यास अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे धाडस कुणी करणार नाही ! – संपादक)