श्रीराम मंदिर सोहळ्याला विहिंपच्या ४ प्रांतांतून २० सहस्र रामभक्त नेणार !
‘माझे गाव माझी अयोध्या’ अंतर्गत गावागावांत अयोध्या अवतरणार !
नागपूर – अयोध्या येथे जानेवारी २०२४ मध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या ४ प्रांतांतून प्रत्येकी ५ सहस्र म्हणजे २० सहस्र भक्तांना अयोध्या येथे नेण्यात येणार आहे, तसेच यवतमाळ विभाग देशातून येणार्या भक्तांसाठी १ मास लंगर चालवणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी दिली. ‘माझे गाव माझी अयोध्या’ अंतर्गत गावागावांत अयोध्या अवतरणार असून प्रत्येक गावामध्ये दिवाळीत करतात तशी रोषणाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा मिळून एक क्षेत्र आहे. या प्रांतात विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे प्रांत आहेत. या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकी ५ सहस्र रामभक्तांना अयोध्या येथे नेण्यात येणार आहे. त्याचे संपूर्ण नियोजन १६ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात येणार्या बैठकीत केले जाणार आहे. त्याच दिवशी प्रवासाचा दिनांकही घोषित करण्यात येणार आहे.