#Navaratri : नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी ?
#Navratri #Navaratri #ShardiyaNavratri शारदीय नवरात्रि
१. ‘घरातील पवित्र स्थानी स्वच्छ आणि चांगल्या (चाळून घेतलेल्या) मातीने वेदी बनवावी.
२. वेदीमध्ये जवस आणि गहू दोन्ही मिसळून पेरावेत.
३. वेदीवर किंवा त्या जवळच पवित्र स्थानावर भूमीचे पूजन करून तिथे सोने, चांदी, तांबे किंवा माती यांचा कलश स्थापन करावा.
४. यानंतर कलशामध्ये आंब्याची हिरवी पाने, दूर्वा, नाणे, अक्षता घालून कलशाच्या कंठाला दोरा बांधावा.
५. कलश स्थापन केल्यानंतर गणेश पूजन करावे. त्यानंतर वेदीच्या एका कडेला देवीची पितळ, सुवर्ण, चांदी, पाषाण, माती यांपैकी एका धातूची मूर्ती किंवा देवीचे चित्र विधीवत् विराजमान करावे.
६. त्यानंतर देवीचे आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार, प्रार्थना इत्यादीने पूजन करावे.
७. यानंतर ‘दुर्गा सप्तशती’चा पाठ आणि दुर्गास्तुती करावी. पाठ आणि स्तुती यानंतर दुर्गादेवीची आरती करून प्रसाद वाटावा.
८. त्यानंतर कन्या भोजन घालावे. नंतर स्वतः फलाहार ग्रहण करावा.
९. प्रतिपदेच्या दिवशीच धान्य पेरण्याचा विधीही सांगितला आहे.
१०. नवमीच्या दिवशी हे पेरलेले धान्य कोणत्याही नदी किंवा तलाव यांमध्ये विसर्जन केले पाहिजे.
११. अष्टमी आणि नवमी या महातिथी मानल्या जातात. या दोन्ही दिवशी पारायणानंतर हवन करावे. नंतर यथाशक्ती कन्यांना भोजन द्यावे.
१२. नवरात्रीत काय करावे ? आणि काय करू नये ? : व्रत करणार्यांनी भूमीवर झोपले पाहिजे. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. व्रत करणार्याने फलाहार घेतला पाहिजे. नारळ, लिंबू, डाळींब, केळी, मोसंबी आणि फणस इत्यादी फळे अन् अन्नाचा नैवेद्य दाखवला पाहिजे. व्रत करणार्याने ‘स्वतः व्रतकाळात नेहमी क्षमा, दया आणि उदारता या सद्गुणांनुसार आचरण करील’, असा संकल्प केला पाहिजे.
१३. या दिवसांमध्ये व्रत करणार्याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.’
(साभार : मासिक ‘अक्षर प्रभात’)