शारदीय नवरात्र व्रत कसे करावे ?
आजपासून ‘नवरात्रोत्सव’ प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने…
‘आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत ‘नवरात्री व्रत’ असते. काही लोक या काळात उपवास करतात. काही जण एक भुक्त राहून शक्ती उपासना करतात. काही ‘दुर्गा सप्तशती’चा पाठ सकाम किंवा निष्काम भावाने करतात. हा पाठ संयम ठेवून करणे आवश्यक असते; म्हणून यम-नियमांचे पालन करत भगवती दुर्गेची आराधना किंवा पाठ केले पाहिजेत. नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते. तिथीचा र्हास आणि वृद्धी यांमुळे यामध्ये न्यूनाधिकता होत नसते.
१. नवरात्री व्रतारंभी करायची प्राथमिक सिद्धता
१ अ. प्रथम वेदी बनवून देवीची स्थापना करणे : आरंभी पवित्र स्थानावरची माती आणून वेदी बनवावी. त्यावर जवस किंवा गहू पेरावे. नंतर त्यावर आपल्या कुवतीनुसार असलेला सोने, तांबे किंवा मातीचा कलश विधीपूर्वक स्थापन करावा. कलशावर सोने, चांदी, तांबे, माती, दगडी मूर्तीची किंवा देवीच्या चित्राची स्थापना करावी. देवीची मूर्ती नसेल, तर कलशाच्या मागे स्वस्तिक काढावे आणि त्याच्या दोन्ही बाजूला त्रिशूळ काढून दुर्गादेवीचे चित्र, ग्रंथ आणि शाळीग्राम ठेवून श्रीविष्णूचे पूजन करावे. पूजा सात्त्विक असावी, राजसिक किंवा तामसिक नसावी.
१ आ. वेद किंवा संप्रदायानुसार विधीवत् पूजा करावी : नवरात्री व्रताच्या आरंभी स्वस्ति वाचन-शांतीपाठ करून संकल्प करावा. तेव्हा सर्व प्रथम गणपतीची पूजा करून मातृका, लोकपाल, नवग्रह आणि वरुण यांचे विधीवत् पूजन करावे. नंतर मुख्य मूर्तीचे षोड्शोपचारे पूजन करावे. आपले इष्टदेव श्रीराम-कृष्ण, लक्ष्मी-नारायण किंवा भगवती दुर्गादेवी इत्यादींची मूर्ती ही प्रमुख मूर्ती समजली जाते. वेद-विधीनुसार किंवा संप्रदाय निर्दिष्टानुसार विधीवत् पूजन केले पाहिजे. दुर्गादेवीची आराधना किंवा अनुष्ठान करतांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे पूजन अन् मार्कंडेय पुराणांतर्गत असलेल्या ‘श्री दुर्गा सप्तशती’चा पाठ करणे, हे अनुष्ठानाचे मुख्य अंग आहे.
२. पाठ करण्याचा विधी
देवीव्रतामध्ये कुमारी पूजन अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. ऐपत (कुवत) असेल, तर नवरात्रीच्या काळात प्रतिदिन किंवा समाप्तीच्या दिवशी ९ कुमारिकांना देवीरूप मानून त्यांचे चरण धुऊन त्यांची गंध-पुष्पादीने पूजा करावी. त्यांना आदराने आणि त्यांच्या आवडीनुसार मिष्टान्न भोजन द्यावे. त्यांचा वस्त्रालंकार देऊन सन्मान करावा. दशमीला पूजेच्या अंतर्गत दुर्गा सप्तशती पाठ करणार्याची पूजा करून त्याला दक्षिणा द्यावी आणि नंतर देवीची आरती करून विसर्जन करावे.’
(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, ऑक्टोबर २००४)
कुमारीकेच्या पूजनाच्या वेळी म्हणावयाचा मंत्रदेवीपूजन झाल्यावर कुमारीची पूजा करतात. प्रथम तिचे पुढील मंत्रांनी आवाहन करतात. मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूपधारिणीम्। अर्थ : मंत्राक्षरमय, लक्ष्मीस्वरूप, मातृकांचे रूप धारण करणारी आणि साक्षात् नवदुर्गात्मिका, अशा कन्येचे मी आवाहन करतो. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’) |