आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन !
मुंबई – १४ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’मध्ये हे अधिवेशन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक, समितीच्या सदस्या सौ. नीता अंबानी या वेळी व्यासपिठावर उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे सदस्य, भारतीय ऑलिंपिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रमुख, भारतीय क्रीडाक्षेत्राशी संबंधित महनीय व्यक्ती या अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. विविध ८० देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या सोहळ्याला उपस्थित होते. ऑलिंपिक स्पर्धेविषयीचे महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात घेतले जाणार आहेत. मुंबईमध्ये प्रथमच हे अधिवेशन होत असून भारत दुसर्यांदा ४० वर्षांनंतर या अधिवेशनाचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी वर्ष १९८३ मध्ये भारतात या समितीचे पहिले अधिवेशन झाले होते.