सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांवर गुन्हा नोंद होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू ! – वैभव खेडेकर, मनसे राज्य सरचिटणीस
खेड येथे निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
खेड, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी अनुक्रमे ‘सनातन धर्म हा रोग आहे’, ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद व्हायलाच हवा. दिरंगाई लावू नका. गुन्हा नोंद होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करूच, अशी ठाम भूमिका मनसेचे राज्य सरचिटणीस श्री. वैभव खेडेकर यांनी पोलिसांना निवेदन देतांना मांडली.
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, खेड यांच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ केल्याच्या संदर्भात आणि धार्मिक भावना दुखावल्याविषयी तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी’, याविषयी तक्रार अर्ज प्रविष्ट करण्यात आला. याविषयीची वैयक्तिक तक्रार धर्मप्रेमी श्री. विनय माळी यांनी प्रविष्ट केली. पोलीस निरीक्षक भोयर यांनी कारवाई करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत खातू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्म जागरण तालुका संयोजक श्री. महेश सातपुते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. नागेश धाडवे, निवृत्त ऑनररी कॅप्टन श्री. राजारामराव भोसले, शिवसेना मुंबके शाखाप्रमुख श्री. प्रवीण सालेकर, फुरुस माजी सरपंच श्री. लक्ष्मण नवरत, स्वराज्य प्रतिष्ठानचे श्री. मंदार गायकवाड, माजी सैनिक श्री. बाबाजी महाडिक, धर्मप्रेमी श्री. अजय तांबडे, श्री. सुनील भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.