रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये नूतनीकरण केल्‍यानंतर त्‍याची भव्‍यता वाढल्‍याचे जाणवणे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘२७.२.२०२३ या दिवशी मी श्री. आकाश कदम यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेला ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये नूतनीकरण करण्‍यापूर्वी आणि केल्‍यानंतर जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे’ हा लेख वाचला. त्‍या समवेत मी दैनिकात छापून आलेले कक्षाचे छायाचित्र पाहिले. ऑगस्‍ट २०१३ मध्‍ये अनेक साधकांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांच्‍या खोलीच्‍या संदर्भातही वेगवेगळ्‍या प्रकारे भव्‍यता जाणवून काही अनुभूती आल्‍या होत्‍या. त्‍याचप्रमाणे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचे ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये नूतनीकरण झाल्‍यानंतर तिचे आकारमान वाढल्‍याचे जाणवले. त्‍या कक्षाचे छायाचित्र पाहिल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. खोलीच्‍या भव्‍यतेच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती 

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात ती खोली

१ अ. खोलीचा आकार मोठा भासून तो डोळ्‍यांच्‍या कक्षेमध्‍ये न सामावणे : खोलीचा आकार आश्रमातील सर्वसामान्‍य खोल्‍यांपेक्षा मोठा वाटला. खोली एका मोठ्या सभागृहाप्रमाणेे जाणवत असल्‍यामुळे ती डोळ्‍यांच्‍या कक्षेत सामावून घेता येत नव्‍हती. यावरून ‘ईश्‍वराच्‍या निर्गुण स्‍वरूपाचे घनीकरण होऊन तो सगुण साकार होतो, म्‍हणजेच आकार धारण करतो’, हे लक्षात आले. ईश्‍वराच्‍या आकारधारणेतून दृश्‍यमानता प्राप्‍त होते. एखाद्या वस्‍तूची आकारमानता आणि व्‍यापकता अधिक असल्‍यास ती आपल्‍या डोळ्‍यांच्‍या कक्षेमध्‍ये सामावत नाही. याचे प्रत्‍यक्ष उदाहरण म्‍हणजे आकाश होय. मानवी डोळ्‍यांच्‍या कक्षेला मर्यादा असल्‍यामुळे ते संपूर्ण आकाशाला एकाच वेळी पाहू शकत नाहीत. त्‍याचप्रमाणे ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या व्‍यापक समष्‍टी कार्याप्रमाणे त्‍यांच्‍या सेवेच्‍या कक्षाचा आकार व्‍यापक होत चालला आहे’, असे मला जाणवले.

सौ. प्रियांका गाडगीळ

१ आ. खोलीच्‍या छताकडे पहातांना क्षितिजापलीकडे पाहिल्‍याप्रमाणे जाणवणे : खोलीच्‍या छताकडे पाहिल्‍यावर मला क्षितिजापलीकडे पाहिल्‍याप्रमाणे जाणवले आणि खोलीचा आकार विशाल असल्‍याचे जाणवले. समुद्रकिनार्‍यावरून सागराच्‍या दृष्‍टीपथात येणार्‍या शेवटच्‍या रेषेकडे पाहिल्‍यावर ‘त्‍या रेषेपलीकडेही काहीतरी आहे’, असे जाणवत असते. अथांग सागराची खोली आणि अंतर मानवी दृष्‍टीच्‍या कक्षेच्‍या पलीकडील आहे. त्‍याप्रमाणेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या कक्षाच्‍या संदर्भात जाणवते.

१ इ. ‘खोली अधिक व्‍यापक होत आहे’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या खोलीत उभे राहून दृष्‍टी उजवीकडून डावीकडे फिरवल्‍यावर ‘खोली अधिक व्‍यापक होत आहे’, असे जाणवते. कलेमध्‍ये ‘यथार्थदर्शन (पर्स्‍पेक्‍टिव्‍ह) चित्रकला’, असा विषय असतो. त्‍यामध्‍ये जागा आणि तिचा आकार हे दोन्‍ही घटक महत्त्वाचे असतात. इमारतीच्‍या बांधकामासाठी वास्‍तूशास्‍त्र विशारद याचा अवलंब करतात. यामध्‍ये एखाद्या वास्‍तूची खोली आणि अंतर दर्शवले जाते. साधकाला खोलीच्‍या कोपर्‍याकडे पाहून यथार्थदर्शन (पर्स्‍पेक्‍टिव्‍ह) चित्र काढले, तर जसे दिसेल; तसे खोल दिसते. यावरून खोलीच्‍या आकारमानात वाढ झाल्‍याचे जाणवते.

१ ई. खोलीत मोठी पोकळी जाणवणे : खोलीत मोठी पोकळी असल्‍याचे जाणवले. अमर्याद त्रिमितीय प्रमाणात जागा म्‍हणजे ‘पोकळी’ होय. यात व्‍यापकत्‍व असते. ही पोकळी काळाला सामावणारी असते. त्‍यामुळे खोलीचे आकारमान मूळ आकारापेक्षा अधिक प्रमाणात वाढल्‍याचे जाणवते.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यातील आध्‍यात्मिक सामर्थ्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून समष्‍टीसाठी प्रक्षेपित होणारे निर्गुणत्‍व आणि व्‍यापकता यांची स्‍पंदने वास्‍तूत उतरणे

व्‍यष्‍टी साधना करणार्‍या संतांच्‍या तुलनेत समष्‍टी साधना करणार्‍या संतांच्‍या देहात समष्‍टीसाठी काळानुसार अधिक प्रमाणात शक्‍ती प्रगट होऊन ती प्रक्षेपित होत असते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यात व्‍यष्‍टी कार्याच्‍या संदर्भात निर्गुणत्‍व आणि समष्‍टी कार्याच्‍या संदर्भात व्‍यापकता वाढली आहे. त्‍यामुळे त्‍यांची ही स्‍पंदने त्‍यांचे कार्यस्‍थळ असलेल्‍या सेवेच्‍या वास्‍तूमध्‍ये उतरल्‍याने या अनुभूती येत आहेत.

३. गुरुतत्त्वाशी एकरूपता प्राप्‍त झाल्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या खोलीप्रमाणे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याही खोलीच्‍या संदर्भात भव्‍यता जाणवणे

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाचा, म्‍हणजे सर्वस्‍वाचा त्‍याग केल्‍यावर त्‍याला गुरुतत्त्वाशी एकरूपता प्राप्‍त होते. या एकरूपतेद्वारे कार्य करून त्‍याला ईश्‍वरस्‍वरूप होता येते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्‍या ‘समष्‍टी सद़्‍गुरुपदी’ विराजमान असल्‍याने त्‍या गुरुतत्त्वाशी एकरूप झाल्‍याची प्रचीती त्‍यांच्‍या या सेवेच्‍या कक्षाच्‍या व्‍यापकतेतून लक्षात येते. गुरुतत्त्वाशी एकरूपता प्राप्‍त झाल्‍यामुळे ऑगस्‍ट २०१३ मध्‍ये परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या खोलीच्‍या संदर्भात जशी भव्‍यता जाणवली होती, तशीच भव्‍यता श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सेवेच्‍या कक्षाच्‍या संदर्भात जाणवते.’

– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पूर्वाश्रमीची कु. प्रियांका लोटलीकर), डोंबिवली, ठाणे. (१.३.२०२३)

वैज्ञानिक दृष्‍टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात अनेक बुद्धीअगम्‍य घटना घडतांना दिसतात. यांतीलच एक वैशिष्‍ट्यपूर्ण घटना म्‍हणजे आश्रमातील संत रहात असलेल्‍या खोलीचा आकार मूळ आकारापेक्षा अधिक मोठा असल्‍याप्रमाणे जाणवणे. काही साधकांना या संदर्भात अनुभूतीही आल्‍या आहेत. ‘या मागे वैज्ञानिक दृष्‍टीकोन काय आहे ?’, याविषयी वैज्ञानिक दृष्‍टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्‍य लाभल्‍यास आम्‍ही कृतज्ञ असू.’ – व्‍यवस्‍थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक