साधिकेच्या मनःस्थितीची कल्पना नसतांना तिला आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगून तिची मातृवत् काळजी घेणार्या वात्सल्यमयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
१. सेवा करतांना साधिकेला एकदम रडू येणे आणि त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भ्रमणभाषवरून तिची विचारपूस करून तिला नामजपादी उपाय करण्यास सांगणे
मी एकदा सेवेच्या ठिकाणी गेल्यावर एका साधकाशी सेवेविषयी बोलत असतांना मला एकदम रडू आले. त्या वेळी ‘मला काय होत आहे ?’, हे मला कळत नव्हते. त्याच वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी माझ्याशी अन्य काहीही न बोलता ‘तुला काय झाले ?’, असे विचारले. त्यांना स्थुलातून माझ्या मनःस्थितीची काही कल्पना नव्हती, तरीही त्यांनी असे विचारल्यावर मी त्यांना ‘मला त्रास होत आहे’, असे सांगून रडू लागले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘हे सर्व वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत आहे. तू आधी नामजपादी उपाय कर.’’
२. उपाय पूर्ण करून जात असतांना समोर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दिसणे आणि त्यांच्या आश्वासक बोलण्याने भावजागृती होणे
त्यानंतर मी उपायांचा नामजप विचारला आणि नामजप करण्यासाठी बसले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे मी दीड घंटा नामजपादी उपाय केले. त्यानंतर मी पाणी पिण्यासाठी जात असतांना मला समोर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दिसल्या. त्यांनी लांबूनच मला पाहिले आणि विचारले, ‘‘आता बरी आहेस ना ? मी समवेत असतांना रडकुंडीला कशाला येतेस ?’’ त्यांचे हे आश्वासक बोल माझ्या हृदयाला भिडले. जसे ‘देव भक्ताला आणि गुरु शिष्याला आश्वस्त करतात’, तसे मला ते जाणवले अन् माझी भावजागृती झाली.
३. ‘देव गुरूंच्या माध्यमातून साहाय्य करायला तत्पर आहे; परंतु स्वतःमध्ये श्रद्धा आणि भाव न्यून आहे’, याची साधिकेला खंत वाटणे
त्यानंतर मला वाटले, ‘देव गुरूंच्या माध्यमातून मला साहाय्य करायला तत्पर आहे; परंतु माझी श्रद्धा आणि भाव न्यून पडत असल्याने मी ते ओळखू शकत नाही. मी गुरूंना अपेक्षित असे प्रयत्न करायला हवेत.’ या प्रसंगातून देवाने मला जाणीव करून दिली, ‘तू सेवा करत नाहीस, तर मीच ती तुझ्याकडून करून घेतो.’ ‘ही गोष्ट बुद्धीने माझ्या लक्षात आली, तरी माझ्याकडून तशी कृती होत नाही आणि माझा अहं जागृत रहातो’, याची मला खंत वाटली. नंतर रात्रीपर्यंत मी सेवा करू शकले.’
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२०)
|