श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या आनंददायी सोहळ्याच्या वेळी भावसागरात चिंब भिजलेल्या साधिकेने अनुभवलेले दिव्य क्षण !
२५.९.२०२२ (भाद्रपद (सर्वपित्री) अमावास्या) या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक सोहळा झाला. या सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आणखी एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मुलगा श्री. सोहम् सिंगबाळ आणि काही साधिका उपस्थित होत्या. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे यजमान सद़्गुरु नीलेश सिंगबाळ वाराणसी येथून या कार्यक्रमात ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे) यांनी अनुभवलेले भावक्षण पुढे दिले आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा साधनाप्रवास ऐकतांना मी धन्य धन्य झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखकमलावर अपार प्रीती विलसत होती आणि त्यांच्या वाणीत भक्तीभाव जाणवत होता. त्यांचा शब्दन्शब्द प्रीतीस्वरूप होता.’ – सौ. अनुराधा निकम |
१. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सहज संवादाद्वारे उलगडलेला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा साधनाप्रवास !
‘२५.९.२०२२ या दिवशी झालेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भावसोहळ्यात आदिशक्तीच्या दोन रूपांचा, म्हणजेच श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा एकमेकींशी झालेला संवाद हा एक अत्युच्च कोटीचा भावसंवादच होता. आम्हा साधकांसाठी त्या सत्संगातील प्रत्येक क्षण परमोच्च आनंददायी होता. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोलतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची उत्कट भावस्थिती होती. ती निःशब्द करणारी होती.
१ अ. गुरुकृपेने ‘कुटुंबाचे दायित्व पार पाडणे आणि समष्टी सेवा करणे’, या दोन्ही गोष्टींचा समन्वय सहजतेने साधता येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : सद़्गुरु बिंदाताई, आपल्या आतापर्यंतच्या साधनाप्रवासाविषयी आम्हाला सांगा.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : सर्वकाही शब्दातीत आहे. माझा संपूर्ण साधनाप्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : साधना करतांना तुमच्या कौटुंबिक जीवनात किंवा व्यवहारात काही कठीण प्रसंग आले का ? आणि त्यांवर तुम्ही कशी मात केलीत ?
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : कठीण प्रसंग आल्यावर ‘हा कठीण प्रसंग आहे’, असे मला कधी वाटले नाही. साधना करणार्या साधकांच्या शब्दकोशात ‘कठीण’ हा शब्दच येत नाही. आरंभी मी अधिकोषातील (बँकेतील) नोकरी आणि घरचे दायित्व सांभाळून सेवा करत होते. त्यानंतर मी आणि माझ्या यजमानांनी (सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी) पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केला. मागील १६ वर्षांपासून माझे यजमान वाराणसी येथे पूर्णवेळ सेवारत आहेत. तेव्हापासून समष्टी सेवा करतांना ‘सासूबाई (सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८३ वर्षे), पती (सद़्गुरु नीलेश सिंगबाळ), मुलगा (श्री. सोहम् सिंगबाळ) आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक ठेवणे’, हे केवळ गुरुकृपेनेच मला शक्य होत आहे. गुरुकृपेने जीवनात कधी आर्थिक अडचण आली नाही किंवा कधीच काही न्यून पडले नाही.
(‘वरील सूत्र ऐकून ‘श्रीसत्शक्ति सौ. सिंगबाळ यांचे परात्पर गुरु डॉक्टरांशी सतत अनुसंधान असल्याने त्यांचे जीवन गुरुकृपेने व्यापून गेले आहे’, असे मला सतत वाटत होते.’ – सौ. अनुराधा निकम)
१ आ. चैतन्याची ओढ असल्यामुळे १ मासाच्या मुलाला घेऊन गुरुपौर्णिमा महोत्सवाला जाणे आणि मुलगा ३ मासांचा असतांना ८ धर्मजागृती सभांची सेवा करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : सोहम् (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा मुलगा) १ मासाचा असतांना गुरुपौर्णिमेचे चैतन्य मिळण्यासाठी मी त्याला घेऊन गुरुपौर्णिमा महोत्सवाला गेले होते.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : बाळ दीड-दोन मासांचे असतांना बाळ आणि आई घराबाहेर पडत नाहीत; पण सद़्गुरु बिंदाताई यांची गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा अन् भाव यांमुळे त्या त्यांच्या बाळाला घेऊन गुरुपौर्णिमा महोत्सवाला गेल्या. त्यांना चैतन्याची ओढ लागली होती. सोहम् अवघ्या ३ मासांचा असतांना त्यांनी (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी) ८ धर्मजागृती सभांची सेवा केली होती.
१ इ. मूळ स्वभाव मितभाषी असूनही साधकांची साधना होण्यासाठी गुरुकृपेने त्यांच्याशी बोलता येऊन त्यांना मार्गदर्शन करता येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : तुम्ही साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्याचे दायित्व कसे सांभाळता ?
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : माझा मूळ स्वभाव अत्यंत मितभाषी होता; परंतु साधकांची साधना होण्यासाठी मला त्यांच्याशी बोलता येऊ लागले. साधकांची साधना गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यावी लागते आणि गुरुकृपेनेच मला हे शक्य होते.
१ ई. गुरूंना अपेक्षित अशी कृती करण्याची तळमळ असल्यामुळे साधकांच्या साधनेची घडी बसवता येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : तुम्हाला सेवा करतांना ताण येत नाही का ?
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : गुरुदेवच माझ्याकडून सर्व करून घेतात आणि तेच मला सेवा करण्यासाठी शक्ती देतात. एकदा ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित सेवा करणार्या साधकांच्या साधनेची घडी बसत नव्हती. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘बिंदा, तुला ही सेवा जमत नसेल, तर दुसर्या कुणाला शिकवू का ?’’ तेव्हा मी गुरुदेवांना सांगितले, ‘‘मी साधकांच्या साधनेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करते.’’ त्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी रात्रभर तळमळत होते. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधकांच्या साधनेची घडी बसवण्यासाठी मी काय करू ?’, हेच विचार माझ्या मनात येत होते. त्यानंतर गुरुकृपेनेच मला ते शक्य झाले.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : तुम्ही दिवसभरात किती वेळ सेवा करता ?
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : सेवा करतांना मला ‘रात्र होऊच नये’, असे वाटते. गुरुदेव सतत माझ्या समवेतच असतात.
(‘हे सूत्र ऐकून माझ्या मनात आले, ‘समष्टीवरील अपार प्रीती, व्यापकता आणि गुरुकार्याशी एकरूपता’, यांमुळेच असे वाटणे शक्य आहे. त्यामुळेच गुरुदेवांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित साधकांच्या साधनेची घडी बसवून घेतली. केवढी ही समष्टीशी एकरूपता !)
– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.९.२०२२)
अध्यात्मातील उच्च पदावर असतांनाही वात्सल्यभाव आणि अहंशून्यता असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् त्यांच्याविषयी मनात कृतज्ञताभाव असणारे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ !श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, तुम्हाला तुमचे यजमान सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या आधी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद आणि सद़्गुरुपद प्राप्त झाले आहे. याविषयी सद़्गुरु नीलेशदादांच्या मनामध्ये कधी ईर्ष्या किंवा नकारात्मकता जाणवली का ? श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ : कधीच नाही. (वरील सूत्र ऐकून मला वाटले, ‘ईश्वरप्राप्ती’ या एकमेव ध्येयासाठी अखंड तळमळत असलेल्या या दांपत्याच्या (सद़्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या) अहंचा लय गुरुकृपा अन् समर्पण यांमुळेच होऊ शकला.’ – सौ. अनुराधा निकम) सद़्गुरु नीलेश सिंगबाळ : जेव्हा मी गोव्याला घरी येतो, तेव्हा सद़्गुरु ताई (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ) मला स्वतःच्या हातांनी जेवण बनवून वाढतात. (‘हे ऐकल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील वात्सल्यभाव जाणवून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. अध्यात्मातील उच्च पदावर असतांनाही केवढा हा वात्सल्यभाव आणि अहंशून्यता ! जेव्हा सद़्गुरु नीलेश सिंगबाळ बोलत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा ‘सद़्गुरु ताई’, असा उल्लेख करतात, तेव्हा ते शब्द आपल्या अंतरीचा ठाव घेतात. त्या वेळी मला एका वेगळ्या भावविश्वाचा अनुभव येत होता. सद़्गुरु नीलेशदादा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना त्यांचा गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी असलेला अपार कृतज्ञताभाव मला अनुभवता येत होता.’ – सौ. अनुराधा निकम) |
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मुलगा श्री. सोहम् यांनी आईविषयी सांगितलेली सूत्रे
आईने ‘मनात काही प्रश्न आल्यास गुरुदेवांना अनुभवण्याचा प्रयत्न कर’, असे सांगणे एकदा मी (श्री. सोहम् ) आईला विचारले, ‘‘आई, तू सेवेत असतेस. बाबा गुरुसेवेसाठी वाराणसीला असतात. माझ्या मनात काही प्रश्न आले, तर मी कुणाला विचारू ?’’ तेव्हा आई मला म्हणाली, ‘‘तू गुरुदेवांना अनुभवण्याचा प्रयत्न कर.’’ लहानपणी आई मला (श्री. सोहम् याला) शाळेत सोडायला येत असे. तेव्हा ती मला म्हणायची, ‘‘तुझ्या शेजारी बाकावर गुरुदेवच बसले आहेत’, याची अनुभूती तू घे.’’ आई सतत शिकण्याच्या स्थितीत असल्याचे जाणवणे एकदा आईने मला तिच्या सेवेच्या संदर्भातील एक प्रसंग सांगितला आणि मला विचारले, ‘‘यात माझे कुठे चुकले ? मी या प्रसंगात काय करायला पाहिजे होते ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘मला तर याविषयी काहीच ठाऊक नाही. तू मला हे का विचारत आहेस ?’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘देव प्रसंगातून शिकवण्यासाठी कुणाच्याही माध्यमातून साहाय्य करत असतो.’’ (‘श्री. सोहम् यांच्या वाणीत अत्यंत सहजता आणि चैतन्य होते. ते अत्यंत ओजस्वीपणे बोलत होते. ते बोलत असतांना ‘त्यांची वाणी आणि जडणघडण ही केवळ गुरुलीलाच आहे’, असे मला वाटत होते.’ – सौ. अनुराधा निकम) |
साधिकेला आलेली अनुभूती आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता !
या दिव्या सोहळ्यानंतर मला रात्री पुष्कळ वेळ झोप आली नाही. मला माझा प्रत्येक श्वास सुगंधी वाटत होता. असे अपार कृपेचे क्षण अनुभवायला दिल्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटिशः कृतज्ञता व्यक्त करते.
– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |