महापालिकेच्‍या शाळेत २ शिक्षिकांनी स्‍वत:च्‍या जागेवर परस्‍पर इतर महिलांची नियुक्‍ती केली !

छत्रपती संभाजीनगर येथील प्रकार !

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेच्‍या येथील जुना बाजार आणि समतानगरमधील शाळांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍यासाठी शाळांतील शिक्षिकांनी परस्‍पर इतर महिलांची नियुक्‍ती केली आहे. या शिक्षिकांना १ लाख रुपये वेतन असून या शिक्षिकांनी महिलांना अल्‍प वेतनावर ठेवले आहे, असे न्‍यायालयाने नियुक्‍त केलेल्‍या समितीच्‍या पहाणीत १२ ऑक्‍टोबर या दिवशी निदर्शनास आले आहे. (शाळा प्रशासन या वेळी काय करत होते ? ‘अशा शिक्षिकांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करायला हवी’, असेच जनतेला वाटते. – संपादक) यामुळे समितीच्‍या सदस्‍यांना धक्‍का बसला. शाळा पडताळणी समितीत उपजिल्‍हाधिकारी, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस उपअधीक्षक, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त आदींचा समावेश आहे.

महापालिका शाळांच्‍या दयनीय अवस्‍थेची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपिठाने राज्‍यातील सरकारी शाळांची पडताळणी करण्‍याचे आदेश प्रशासनाला दिले. त्‍यानुसार जिल्‍हानिहाय प्रधान जिल्‍हा न्‍यायाधिशांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. न्‍यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्‍यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महापालिका, जिल्‍हा परिषद, नगरपालिका अन् नगरपंचायती यांच्‍या शाळांची अवस्‍था आणि समस्‍या यांची पडताळणी करून अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले आहेत. (खरेतर हे काम शिक्षणाधिकार्‍यांचे असतांना त्‍यांनी याकडे लक्ष का दिले नाही ? शाळांची दयनीय अवस्‍था आणि तेथील अनागोंदी कारभार यांच्‍याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी. – संपादक)