सुळकूड पाणी योजनेच्या कार्यवाहीसाठी इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे लाक्षणिक उपोषण !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सुळकूड पाणी योजनेच्या कार्यवाहीसाठी ‘इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती’च्या वतीने १३ ऑक्टोबरला म. गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात नागरिक, महिला, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. या प्रसंगी ‘पाणी आमच्या हक्काचे’, ‘पाणी द्या, न्याय द्या’, ‘इचलकरंजीला पाणी मिळालेच पाहिजे’, यांसह अन्य घोषणा देण्यात येत होत्या.
इचलकरंजीसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकूड गावातून ‘अमृत २’ योजनेच्या अंतर्गत नळ पाणी योजनेला संमती मिळाली आहे. या योजनेला कागलसह अनेक गावांचा मोठा विरोध होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याला विरोध दर्शवला होता. या योजनेच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ११ ऑक्टोबरला बोलावलेली बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या विषयाला वाचा फोडण्यासाठी ‘इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती’च्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात ‘व्हिजन इचलकरंजी’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.