महिलांनी तोकड्या कपड्यांत नृत्य करणे अश्लीलता नाही ! – नागपूर खंडपिठाचा निर्वाळा
मुंबई – महिलांनी तोकड्या कपड्यांत नृत्य किंवा हातवारे करण्याला अश्लीलता म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १३ ऑक्टोबर या दिवशी एका प्रकरणात सुनावणी करतांना दिला. महिलांनी तोकडे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी नृत्य केले असेल, ते अश्लील असेल किंवा कुणाला त्याचा त्रास होत असेल, तर भारतीय दंड विधान संहिता कलम २९४ लागू केले जाऊ शकते. प्रस्तुत घटना सार्वजनिक ठिकाणी घडली; पण ती अश्लील नव्हती किंवा त्यामुळे कुणाला त्रासही झाला नाही, असे न्यायालयाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी एका रिसॉर्ट आणि ‘वॉटर पार्क’च्या बँक्वेट हॉलवर धाड घातली होती. तिथे ६ महिला तोकडे कपडे घालून नृत्य करत होत्या, तर याचिकाकर्ते त्यांच्यावर पैसे उधळत होते. पोलिसांनी या प्रकरणी महिला आणि पुरुष यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. तिथे वरील सुनावणीनंतर न्यायालयाने ५ जणांच्या विरोधातील तक्रार रहित केली.