अल्प पाऊस पडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १२४ गावांमध्ये अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा !
पुणे – यंदा पडणार्या पावसाची टक्केवारी न्यून झाली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा सोडल्यास अन्य ४ जिल्ह्यांतील १२४ गावे टंचाईग्रस्त आहेत, तर १० तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती भीषण आहे. टंचाईग्रस्त १२४ गावांमध्ये २ लाख २२ सहस्र ३६० नागरिकांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या ४ तालुक्यांमध्ये ७८ गावांमध्ये, सांगलीतील जत अन् आटपाडी तालुक्यांतील ३२ गावे, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, करमाळा अन् माढा तालुक्यातील ४ गावे, तर पुणे जिल्ह्यातील केवळ पुरंदर तालुक्यातील १० गावे टंचाईग्रस्त आहेत. या टंचाईग्रस्त १२४ गावांमध्ये १३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ११२ खासगी, तर केवळ २२ टँकर हे सरकारचे आहेत. पाण्यासाठी १०३ विहिरी आणि विंधन विहिरी शासनाने स्वत:कडे घेतल्या आहेत. न्यून झालेला पाऊस आणि चालू असलेले टँकर पहाता डिसेंबरपासून पाणीटंचाई तीव्र होईल, असे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात येत आहे.