हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. ‘सनातन धर्म हा अविनाशी आहे आणि तो कुणीही नष्ट करू शकत नाही’, हा विचार किंवा ही वृत्ती धोकादायक आहे. ‘अविनाशी सनातन धर्म, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत काय योग्य आहे ?’, याविषयीचे ज्ञान कुणीही नष्ट करू शकत नाही; परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल.

तमिळनाडूचे मंत्री आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी जे सांगितले (सनातन धर्माला नष्ट करण्याचे वक्तव्य), ते चर्च, इस्लामचे मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि साम्यवादी यांचे कित्येक शतकांपासूनचे स्वप्न आहे. यामध्ये उदयनिधी स्टॅलिन एकटेच नाहीत. ज्या परिषदेत ते ‘सनातन धर्म नष्ट केला पाहिजे’, असे बोलले, त्या परिषदेला ‘सनातन धर्म नष्ट करणे’, असे शीर्षक देण्यात आले होते. त्यांनी हिंदु धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यू यांच्याशी करत तो नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे विधान केले. याविषयी त्यांच्यावर टीका झाल्यानंतर स्वतःचा बचाव करतांना ‘मी हिंदूंच्या हत्याकांडाची मागणी केली नव्हती’, असे विधान केले आणि त्यांचे हिंदु धर्माविषयीचे विधान स्तुत्य असल्याचे त्यांनी भासवले.

१. उदयनिधी यांना सनातन धर्म नष्ट का करावासा वाटतो ?

उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्माविषयी एवढे अज्ञान आहे का ? सनातन धर्म सांगतो की, सर्वांमध्ये आत्म्याचे अस्तित्व आहे आणि तो पवित्र आहे. हे त्यांना ठाऊक नाही का ? वेद आणि उपनिषदे हे सनातन धर्माचे मूळ ग्रंथ असून त्यांना आशियामध्ये मोठा मान आहे, तसेच या ग्रंथांमधून अनेक पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक यांनी स्फूर्ती घेतली आहे, हे त्यांना ठाऊक नाही का ? सध्या विज्ञानामधील सर्वांत आधुनिक असलेली भौतिक शास्त्रामधील ‘क्वाँटम थिअरी’ वेदातील ज्ञानावर आधारित आहे. सनातन धर्म हा सर्व मानवतेला सामावून घेणारा आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्।’, म्हणजेच ‘संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे’, असे मानणारा आहे, हे त्यांना ठाऊक नाही का ? याउलट अब्राहमिक धर्म (एकेश्‍वरवाद मानणारे इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू पंथांना अब्राहमिक धर्म म्हटले जाते.) त्यांचा धर्म मानणारे आणि न मानणारे असा भेदभाव करून मानवतेचे विभाजन करत आहेत. जे त्यांचा धर्म मानत नाहीत, त्यांना ते समान वागणूक देत नाहीत. सनातन धर्म किंवा हिंदुत्व यांची जातीव्यवस्थेशी तुलना करतांना ब्रिटिशांनी ही श्रेणी असलेली व्यवस्था निर्माण केली, हे त्यांना ठाऊक नाही का ? ब्रिटिशांनी काही जातींना जन्मापासूनच गुन्हेगार ठरवले होते. वैदिक वर्णव्यवस्था ही समाजासाठी ‘आदर्श’ आहे, हे त्यांना ठाऊक नाही का ? समाजात एकोपा नांदण्यासाठी ४ वर्ण अत्यंत आवश्यक आहेत. वेदांमध्ये ४ वर्णांची शरिराच्या भागांशी तुलना केली आहे. ब्राह्मण वर्णाची तुलना डोक्याशी, क्षत्रियांची तुलना हातांशी, वैश्याची तुलना मांड्यांशी आणि शूद्रांची तुलना पायांशी केली आहे. याचा अर्थ ‘डोक्याला मान द्यावा आणि पायांना वाईट वागणूक द्यावी’, असे मुळीच नाही. तरीही भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव असल्याचे दिसून येते.

२. तत्कालीन भारतात असलेली असमानता आणि दिली जाणारी वागणूक

मी वर्ष १९८० मध्ये जेव्हा भारतात नवीन होते, तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी एका रेल्वेमध्ये होते आणि रेल्वे सुटण्याच्या बेतात होती. त्या वेळी एक चांगला पोषाख घातलेली व्यक्ती डब्यात उशिरा चढली आणि त्याच्यासह त्याचे सामान घेऊन हमाल चढला. हमालाला पैसे देण्याऐवजी त्याने आपली पाण्याची बाटली भरण्यासाठी त्याला पाठवले. तो हमाल त्वरित बाहेर गेला आणि पाण्याची बाटली भरून आणेपर्यंत रेल्वे चालू झाली. या गाडीतील माणसाने सावकाशपणे स्वतःची पैशांची पिशवी उघडली आणि त्याला काही पैसे देऊ केले. हमाल धावत धावत दाराशी आला आणि त्याने उडी मारून ते पैसे पकडले. त्या वेळी ‘तो हमाल कोणत्या जातीचा वा वर्णाचा होता ?’ किंवा ‘गाडीत चढलेली व्यक्ती कोण होती ?’, हे मला ठाऊक नव्हते. त्या वेळी मला भारताविषयी अगदी अल्प माहिती होती; परंतु त्याची हमालाकडे थंडपणे पहाण्याची वृत्ती ही वसाहतवादी ब्रिटिशांची परंपरा असल्याप्रमाणे मला वाटली. त्यानंतर मला कळले की, जो इंग्रजी चांगले बोलतो आणि ज्याला इंग्रजी बोलता येत नाही, यावर आधारित भारतात जातीव्यवस्था आहे. जे इंग्रजी चांगले बोलू शकतात, त्यांना चांगल्या वेतनाची नोकरी मिळत होती आणि त्यामुळे ते समाजातील इतर लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत होते. त्या वेळी कदाचित् भारतियांना कळले नव्हते की, जे ब्रिटीश अधिकारी भारतात कृपाशीलता दाखवतात, ते त्यांच्या देशात तसे वागू शकत नाहीत. ते भारतातील स्थानिक लोकांना असंस्कृत मानून त्यांच्याविषयी तिरस्कार दाखवण्यासाठी ते तसे वागत होते.

३. वैदिक वर्णव्यवस्था समानतेवर आधारित !

ब्रिटीशांकडून प्रशासन हातात घेतल्यानंतर ‘आपल्याखाली काम करणार्‍यांकडून मान मिळवण्यासाठी असे वागणे आवश्यक आहे’, असे भारतियांना वाटते का ? तसेच माझ्या असे लक्षात आले की, अनेक भारतीय त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या वयस्कर माणसांना नम्रपणे संबोधतांना दिसत नाहीत. तसेच या माणसांची मुले आणि त्यांचे पाहुणे यांच्याविषयीही तीच भाषा वापरतात. याचा वैदिक समाजरचनेशी काहीही संबंध नाही, तर हे ब्रिटिशांचे अवशेष आहेत. ‘वैदिक वर्णव्यवस्थेमध्ये दुसर्‍यांचा अवमान करण्याची संकल्पना नसून समाज चांगला चालण्यासाठी सर्व प्रकारची कामे केली पाहिजेत’, अशी संकल्पना आहे. ही रचना श्रेणी पद्धतीवर आधारित नसून समानतेवर आधारित आहे.

४. विदेशात भारताविषयी निर्माण करण्यात आलेले चुकीचे चित्र

मी जर्मनीत प्राथमिक शाळेत असतांना ‘भारतात भयानक जाचक अशी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता आहे’, असे मला शिकवले गेले होते. याचे कारण चर्चला १८ आणि १९ व्या शतकात भारतातील ज्ञानाच्या प्रशंसेच्या विरोधात काम करायचे होते. याची पद्धत म्हणजे मुलांना सांगणे, ‘‘कल्पना करा की, उद्धट ब्राह्मण खालच्या जातीतील लोकांकडून पाणी घेत नाहीत किंवा त्यांना स्पर्श करत नाहीत; कारण ते खालच्या जातीतील लोकांना अस्वच्छ मानतात. हे किती भयानक आहे !’’ या स्वच्छतेच्या नियमांविषयी एखादा चर्चा करू शकेल; परंतु या नियमांमुळे अत्यंत लाभदायक असलेल्या सनातन धर्माला नष्ट करण्याची मागणी करणे, हा कसला ढोंगीपणा आहे ? ‘एखाद्या पुस्तकावर विश्‍वास ठेवत नाही; म्हणून लाखो लोकांचा छळ करून त्यांना ठार मारणे, यांपेक्षा जो मांस खातो त्याला न शिवणे, हे अधिक क्रूरतेचे आहे’, असे चित्र उभे केले गेले. दोन अब्राह्मिक धर्म आणि साम्यवादी यांनी मानवतेच्या विरोधात केलेली प्रचंड प्रमाणातील पापे याचा कुठेही उल्लेख होत नाही; परंतु भारतीय जातीव्यवस्थेविषयी अभ्यासक्रम शिकवला जातो, तसेच वृत्तवाहिन्यांवरूनही बोलले जाते.

५. दक्षिण भारतातील राजकारणी सनातन धर्म आणि ब्राह्मण यांच्यावर घाला का घालत आहेत ?

याचे एक कारण म्हणजे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ख्रिस्तीकरण करण्याचे मोठे नियोजन आहे. ख्रिस्तीकरणासाठी थॉमस अपोस्टल हा पहिल्या शतकात केरळमध्ये आला. ‘त्याला धूर्त ब्राह्मणांनी चेन्नईमध्ये ठार मारले’, या खोट्या कथेचा आधार घेतला जातो. ब्राह्मण हे त्यांच्यासाठी अडथळा आहेत; कारण त्यांनी वेदांमधील ज्ञान जिवंत ठेवले आहे. ते खरोखरच सनातन धर्माचे प्रमुख आहेत आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांना ते नकोसे वाटत होते. जर ब्राह्मणांची स्थिती हलाखीची केली आणि त्यांना देशातून बाहेर काढले, तर मिशनरींना धर्मांतर करून सनातन धर्म नष्ट करण्याची संधी अधिक प्रमाणात मिळेल. याचा उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाशी संबंध लागतो.

नोव्हेंबर २०२२ मध्ये स्टॅलिन यांनी म्हटले होते, ‘मला ख्रिस्ती असल्याचा अभिमान आहे.’ मला ठाऊक नाही की, त्यांना ख्रिस्ती धर्माचा अभिमान का आहे ? ख्रिस्तीकरणाच्या नावाखाली भारत आणि इतरत्र लाखो लोकांची हत्या करण्याचा चर्चचा इतिहास आहे. याचा त्यांना अभिमान आहे का ? कि ‘खरा देव केवळ ख्रिस्त्यांना स्वर्गात पाठवतो आणि हिंदूंना नरकात पाठवतो’, या शिकवणीचा आहे ?, हे त्यांनी स्पष्ट करावे; परंतु ते तसे करणार नाहीत; कारण ख्रिस्ती धर्माचा अभिमान असल्याचे त्यांच्याकडे सबळ कारण नाही. त्याही थोडे मागे जाऊन पाहिले, तर लक्षात येईल की, त्यांनी ‘मी स्वतः नास्तिक आहे’, अशी घोषणा केली. तरीही मानवतेचा आधार असलेला अविनाशी सनातन धर्म आणि हिंदू यांच्यावर भारतातही मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत. ज्यांना मानवतेवर पूर्ण नियंत्रण आणायचे आहे, त्यांच्यासाठी सनातन धर्म हा धोकादायक आहे.

६. हिंदु धर्म नष्ट करण्याच्या आवाहनाकडे हिंदूंनी लक्ष देणे आवश्यक !

जागतिक ‘आर्थिक व्यवस्थेविषयी बोलणारा युवल नोह हरारी हा एक मोठा तत्त्वज्ञानी (?) आहे. तो म्हणतो, ‘आत्मा किंवा देव अस्तित्वात नाही.’ हिंदु धर्मावर आता उघडपणे आघात केले जात आहेत; कारण अलीकडच्या वर्षांत हिंदु धर्माला बळकटी येत आहे. बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या सत्संगात येणार्‍या लोकांची गर्दी पाहून त्यांना चिंता वाटत असेल. त्यामुळे दोन विशेष धर्मांनी (इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांनी) हिंदु धर्म नष्ट करण्याविषयीचे आवाहन अगदी पूर्वीपासून केले आहे आणि त्याकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आहे. आता राजकारणीही त्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे हे एक प्रकारे हिंदु धर्माच्या विरोधात युद्ध घोषित केल्याप्रमाणे आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पुराणांमध्ये देव आणि असुर यांच्यामधील प्राचीन युद्धे सांगितली आहेत. काही वेळा असुरांना आशीर्वाद मिळत होता आणि ते अजिंक्य असल्याप्रमाणे वागत होते; परंतु नेहमी देवतांचाच विजय झाला. असे जरी असले, तरी हे सर्व युद्धं केल्याविना झालेले नाही.

– मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक, जर्मनी.