१४ ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व टोलनाक्यांवर कॅमेरे लावणार ! – राज ठाकरे

टोलवसुलीविषयी राज्य सरकार आणि मनसे यांची एकत्रित पत्रकार परिषद !

मुंबई – मुंबईतील प्रवेशमार्गावरील सर्व टोलनाक्यांवर कशा प्रकारे टोलवसुली होते ?, हे पहाण्यासाठी १४ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस राज्य सरकार आणि मनसे यांच्याकडून कॅमेरे लावले जाणार आहेत, अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १३ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे हेही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘टोलनाक्यांवर लावण्यात येणार्‍या कॅमेर्‍यांचे नियंत्रण मंत्रालयातून करण्यात येईल. कॅमेर्‍यांमुळे प्रत्येक दिवशी टोलनाक्यावरून किती गाड्या जातात ? टोलनाक्यांवर रुग्णवाहिका, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहे आहेत ना ? आदी माहिती घेतली जाईल. मुंबईतील मार्गांवरील उड्डाणपुलांचे मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (बांधकामाच्या दर्जाची तपासणी) केले जाईल. ‘टोलनाक्यांवरील पिवळ्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांगा गेल्यास टोल न घेता वाहने सोडली जातील’, असा करार आहे. त्यानुसार कार्यवाही होत आहे का ? त्यानुसार किती वाहने सोडण्यात आली ? हे पहाण्यात येईल.

दिवसभरात किती टोल भरला ?, याची माहिती फलकाद्वारे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना लावण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल. अवजड वाहनांना शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा, याविषयी सरकार विचार करेल. रस्त्यांच्या दुरुस्तीचे दायित्व टोलवाल्यांचे आहे.

टोलनाक्यांवरील कर्मचार्‍यांची पूर्वपीठिका जाणून घेणार ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री

टोलनाक्यांवर वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पूर्वजीवनाची पार्श्‍वभूमी पडताळण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आदेश देण्यात आला आहे. सरकारकडून टोलनाक्यांवर स्वच्छतागृहाचे ‘कंटेनर’ ठेवले जातील.