सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे झाराप येथील शाळेत शिक्षक देणे अशक्य !
|
कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र झाराप क्रमांक १ या शाळेत शासनाच्या मान्यतेनुसार चौथा शिक्षक देण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शवली. या शाळेत आता सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असून या शिक्षकाचे वेतन शासन देणार आहे. त्यामुळे येथील पालकांनी अखेर आंदोलनाच्या तिसर्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबर या दिवशी ‘शाळा बंद’ आंदोलन मागे घेतले आहे.
झाराप येथील शाळेत शिक्षकांच्या ४ पदांना शासनाची मान्यता आहे. या शाळेत सध्या २ शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे सध्या एकच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत शिक्षक मिळावेत, यासाठी पालकांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. या शाळेत ४ शिक्षक मिळावेत आणि मुलांची शैक्षणिक हानी टळावी, यासाठी पालकांनी ९ ऑक्टोबरपासून ‘शाळा बंद’ आंदोलन चालू केले होते. या आंदोलनाची नोंद घेत शिक्षण विभागाने एका शिक्षकाची शाळेत नियुक्ती केली. हे शिक्षक ११ ऑक्टोबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले; मात्र चौथा शिक्षक नियुक्त करण्यात येत नाही, तोपर्यंत ‘शाळा बंद’ आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार करत तिसर्या दिवशीही पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नव्हते.
सद्य:स्थितीत शिक्षण विभागाकडे आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने शासनाने संमत केलेल्या पदांएवढे शिक्षक देता येत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
संपादकीय भूमिका
|