अखंड आणि निष्‍ठेने गुरुसेवा करणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या अवतारी कार्याची ओळख !

‘श्रीविष्‍णूच्‍या दोन शक्‍ती, म्‍हणजे ‘भूदेवी’ आणि ‘श्रीदेवी’ ! सप्‍तर्षींनी जीवनाडीपट्टीच्‍या माध्‍यमातून अनेक वेळा सांगितले आहे, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले श्रीविष्‍णूचे अवतार आहेत. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या भूदेवीचा आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या श्रीदेवीचा अवतार आहेत. द्वापरयुगात श्रीविष्‍णूने श्रीकृष्‍णाचा अवतार धारण केला होता. त्‍या वेळी भूदेवी ही ‘सत्‍यभामे’च्‍या रूपात पृथ्‍वीवर अवतरली आणि श्रीदेवी ही ‘रुक्‍मिणी’च्‍या रूपात पृथ्‍वीवर आली. द्वापरयुगात जी भूदेवी ‘सत्‍यभामे’च्‍या रूपात अवतरली, तीच आता ‘श्रीसत्‌शक्‍ति’ यांच्‍या रूपात सनातनच्‍या साधकांसाठी आली आहे.’ 

आज सर्वपित्री अमावास्‍या, म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति यांची जन्‍मतिथी (५६ वा वाढदिवस) आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या अवतारी कार्याची थोडीफार ओळख करून घेऊया.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आत्‍मस्‍वरूप !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘श्री महालक्ष्मी कमलासनावर अखंड समाधी अवस्‍थेत असते. हे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आत्‍मस्‍वरूप आहे. त्‍या सच्‍चिदानंद स्‍वरूपिणी आहेत. त्‍या श्रीविष्‍णूची प्रकट शक्‍ती आहेत. सर्व देवता, ॠषिमुनी, योगी, महापुरुष, मनुष्‍य आणि जीवसृष्‍टी ‘भूदेवी’ म्‍हणून जिचे पूजन करतात, अशा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सनातनच्‍या साधकांचे परिपालन करणार्‍या ‘मोक्षगुरु’ आहेत. त्‍या साक्षात् शक्‍तिस्‍वरूपिणी जगन्‍मातेला त्‍यांच्‍या अवतार धारणेच्‍या तिथीनिमित्त सनातनच्‍या सर्व साधकांच्‍या वतीने कोटी कोटी वंदन !’

– श्री. विनायक शानभाग (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ४० वर्षे), चेन्‍नई, तमिळनाडू. (२.१०.२०२३)

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्री. सोहम् सिंगबाळ

१. सृष्‍टीचे रहस्‍य जाणणारे सप्‍तर्षी ज्‍यांना ‘भूदेवी’, ‘श्रीसत्‌शक्‍ति’ आणि ‘श्री महालक्ष्मी’ असे संबोधतात, त्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याविषयी नाडीपट्ट्यांमध्‍ये लाखो पाने लिहिलेली असणे

श्री. विनायक शानभाग

पृथ्‍वीवर जवळ जवळ ८०० कोटी मानवी जीव आहेत. या सर्व मानवी जिवांविषयी ऋषि-महर्षींनी लिहून ठेवलेले नाही. महर्षींनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा उल्लेख करतांना त्‍यांना ‘भूदेवी’, ‘श्रीसत्‌शक्‍ति’ आणि ‘श्री महालक्ष्मी’ असे संबोधले आहे. सप्‍तर्षींनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी सहस्रो नाडीपट्ट्यांमधून लाखो पाने लिहिली आहेत. त्‍याचप्रमाणे सप्‍तर्षींनी गुरुदेवांच्‍या दोन्‍ही आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍याविषयीही लाखो पाने लिहिली आहेत. ज्‍यांच्‍याविषयी सप्‍तर्षींना एवढे लिहून ठेवावेसे वाटते, त्‍या स्‍त्रिया सामान्‍य कशा असू शकतील ?

सनातन संस्‍थेसाठी ही भाग्‍याची घटना आहे की, भूदेवीचा अवतार असलेल्‍या श्रीसत्‌शक्‍तींविषयी सप्‍तर्षींनी काढलेले गौरवोद़्‍गार, तसेच त्‍यांचे स्‍थूल आणि सूक्ष्म कार्य यांविषयी सांगितलेली सूत्रे ‘सप्‍तर्षी जीवनाडी पट्टी’च्‍या माध्‍यमातून पृथ्‍वीवर उपलब्‍ध झाली आहेत.

२. अखंड गुरुस्‍मरण करत गुरुसेवेत रत होऊन परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे मन प्रसन्‍न करून घेण्‍याचे गुह्य जाणलेली सर्वोत्तम शिष्‍यमूर्ती म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या माध्‍यमातून सेवेला आरंभ केला. त्‍या वेळी कुणालाही वाटले नव्‍हते की, ‘संत’, ‘सद़्‍गुरु’ असे आध्‍यात्मिक उन्‍नतीचे टप्‍पे गाठत सौ. बिंदा सिंगबाळ सनातन धर्माच्‍या संस्‍थापनेसाठी पृथ्‍वीवर आलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ‘एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी’ होतील ! अखंड गुरुस्‍मरण आणि ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करून कठिणातील कठीण प्रसंगांतही त्‍यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे मन जिंकले आहे. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

२ अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित अशा प्रकारे साधकांच्‍या व्‍यष्‍टी-समष्‍टी साधनेची घडी बसवणे : साधकांची आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी गुरुदेवांनी सनातन संस्‍थेची स्‍थापना केली. गुरुदेवांनी साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना शिकवली अन् सहस्रो साधकांकडून ती करून घेतली. गुरुदेवांनी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधकांच्‍या व्‍यष्‍टी-समष्‍टी साधनेची घडी बसवली आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून साधना करत असलेले साधक, संत आणि सद़्‍गुरु यांच्‍यामध्‍ये संघटित भाव टिकवून ठेवणे, साधकांना साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात जाता यावे, यासाठी आवश्‍यक ते पालट करण्‍यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहन देणे, साधकांच्‍या जीवनातील सुख-दुःखाच्‍या प्रसंगांत सहभागी होऊन त्‍यांचा साधनेतील उत्‍साह टिकवून ठेवणे, साधक आणि संत झालेल्‍या साधकांमध्‍ये परस्‍पर आदरभाव बाळगण्‍याची, तसेच शिकण्‍याची वृत्ती टिकवून ठेवणे, अशा पद्धतीने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी संस्‍था स्‍तरावरील साधकांच्‍या व्‍यष्‍टी-समष्‍टी साधनेची घडी बसवली आहे.

२ आ. ‘भक्‍तीसत्‍संगा’च्‍या माध्‍यमातून अधिकाधिक साधकांमध्‍ये ईश्‍वरप्राप्‍तीसाठी आवश्‍यक असलेला भाव जागृत करणे : गुरुदेव नेहमी सांगतात, ‘‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी साधकांमध्‍ये ‘तळमळ’, ‘भाव’ आणि ‘श्रद्धा’ हे तीन गुण अत्‍यंत आवश्‍यक आहेत.’’ ‘सर्वांमध्‍ये भाव असेलच’, असे नाही आणि ‘भाव असला, तरी तो सतत जागृत असतोच’, असेही नाही. मागील ७ वर्षांपासून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सर्वत्रच्‍या साधकांसाठी ‘भक्‍तीसत्‍संग’ घेत आहेत. या माध्‍यमातून त्‍यांनी अधिकाधिक साधकांमध्‍ये ईश्‍वर आणि गुरु यांच्‍या प्रती भाव जागृत करून तो टिकवून रहाण्‍यासाठी प्रयत्न केले. भावाचा भुकेला असलेल्‍या ईश्‍वराला, म्‍हणजे गुरुदेवांना त्‍यांनी भक्‍तीसत्‍संगाच्‍या रूपातून बांधून ठेवले आहे. श्रीसत्‌शक्‍ति यांनी त्‍यांच्‍या चैतन्‍यमय वाणीतून सनातनचे साधक आणि गुरुदेव यांच्‍यामध्‍ये हे आनंदाचे भावबंधन साकार केले आहे.

३. प्रत्‍येक युगात मानवजातीची अखंड काळजी घेणारी श्रीविष्‍णूची शक्‍ति भूदेवी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात राहून सहस्रो साधकांची काळजी घेत असणे

श्रीविष्‍णूच्‍या प्रत्‍येक अवतार धारणेला पूरक असणार्‍या आणि श्रीविष्‍णूच्‍या समवेत अवतार धारण करून पृथ्‍वीवर येणार्‍या भूदेवीने प्रत्‍येक युगात कधीच स्‍वतःचा विचार केला नाही. तिने सतत इतरांचाच विचार केला. प्रत्‍येक युगात भूदेवीला तिच्‍या मुलांची (मानवजातीची) काळजी वाटत होती. आज तीच भूदेवी, जी श्रीविष्‍णूची शक्‍ती आहे, ती मनुष्‍य रूप धारण करून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहात आहे. सनातनच्‍या सर्वत्रच्‍या सहस्रो साधकांची ती काळजी वहात आहे. स्‍वतःच्‍या कुटुंबापेक्षा साधक कुटुंबासाठी वाहून घेणार्‍या ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ साधकांसाठी किती कष्‍ट घेत आहेत’, याची थोडीफार कल्‍पना यावी’, यासाठी काही गोष्‍टी आज येथे विशद करतो.

३ अ. साधकांचा आध्‍यात्मिक त्रास दूर होण्‍यासाठी अविरत झटणार्‍या ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यावर सूक्ष्मातून होणारी वाईट शक्‍तींची आक्रमणे अन् त्‍यांची तीव्रता ! : ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हावी’, यासाठी दिवसरात्र झटत असलेल्‍या सनातनच्‍या सेवाभावी साधकांवर सप्‍तपाताळांतील वाईट शक्‍ती दिवसरात्र आक्रमण करत आहेत. गुरुदेवांनी वाईट शक्‍तींशी लढून सनातनच्‍या सहस्रो साधकांचे आध्‍यात्मिक त्रास दूर केले आहेत. त्‍यांच्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही साधकांसाठी झटत आहेत. याविषयी सप्‍तर्षींनी जीवनाडीपट्टीत पुढीलप्रमाणे लिहिले आहे, ‘श्रीसत्‌शक्‍ति आणि श्रीचित्‌शक्‍ति यांच्‍यावर सूक्ष्मातून होणार्‍या वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आक्रमणांचा स्‍थुलातील परिणाम म्‍हणजे रक्‍तदाब वाढणे, चक्‍कर येणे, ठरवलेल्‍या मुख्‍य सेवा पूर्ण करण्‍याऐवजी अकस्‍मात् उद़्‍भवणार्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यात वेळ जाणे, झोपलेले असतांना ‘कुणीतरी गळा दाबत आहे’, असे जाणवणे, कूस पालटतांना पुष्‍कळ कष्‍ट होणे, श्‍वास कोंडल्‍यासारखा होणे, वातावरणात प्रचंड दाब जाणवणे, प्रचंड गुंगी येणे, अस्‍वस्‍थ वाटणे, डोळे उघडता न येणे, अनावर गुंगी येऊन झोपावेसे वाटणे, झोपेतून उठतांना डोळे उघडता न येणे, कुणाला तरी हाक मारायची असतांना तोंडातून आवाज न फुटणे, आदी त्रास होत आहेत. अनेक वेळा वाईट स्‍वप्‍ने पडणे, स्‍वप्‍नांमध्‍ये जळलेले शव दिसणे, सापळे किंवा कवट्या दिसणे, असेही त्रास होत आहेत. (श्रीसत्‌शक्‍ति आणि श्रीचित्‌शक्‍ति यांना आतापर्यंत असे अनेक अनुभव आले आहेत. – संकलक) सामान्‍य साधकाला असे झाले, तर तो भ्रमिष्‍ट किंवा वेडा होऊ शकतो.’ – सप्‍तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून, १७.८.२०२३, सप्‍तर्षी जीवनाडी वाचन क्र. २२९)

३ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या कुटुंबियांवर वाईट शक्‍तींची आक्रमणे होत असूनही त्‍यांनी त्‍याविषयी वाच्‍यता न करणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या कुटुंबियांवरही वाईट शक्‍तींची आक्रमणे सतत होत आहेत; मात्र याविषयी त्‍यांनी कधी वाच्‍यताही केली नाही.

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे पती सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांना मागील २ वर्षांपासून अनेक शारीरिक त्रास होत आहेत. त्‍यांची वैद्यकीय चाचणी केल्‍यावर ‘सर्व व्‍यवस्‍थित आहे’, असे आढळते. विनाकारण छातीत दुखणे, पोटात तीव्र वेदना होणे आदी त्रास होत असतांनाही ते वाराणसी आश्रमात राहून धर्मप्रसार सेवा करत आहेत.

२. मुलगा श्री. सोहम् यांना झोप न लागणे, अन्‍न न जाणे, झोपेतून उठतांना त्रास होणे, वारंवार होणार्‍या दातांच्‍या त्रासांमुळे अन्‍न घेतांना त्रास होणे, दातांसंबंधी आजार लवकर बरे न होणे आदी त्रास होत आहेत.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सासूबाई पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ आणि आई पू. (श्रीमती) मळयेआजी यांनाही गेल्‍या वर्षभरात अनेक शारीरिक त्रास झाले.

असे त्रास असूनही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी स्‍वतःच्‍या कुटुंबाला गुरुचरणी अर्पण केले आणि स्‍वतःच्‍या कुटुंबापेक्षा सनातनच्‍या साधक कुटुंबाला अधिक प्राधान्‍य दिले. परिवारातील सदस्‍यांना आवश्‍यक तेवढाच वेळ देऊन त्‍या साधकांच्‍या साधनेतील अडचणी दूर करण्‍यासाठी सर्व वेळ देतात.

४. कृतज्ञता

आज श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने त्‍यांनी वेळोवेळी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार सर्वत्रच्‍या साधकांनी कृती करणे, हीच त्‍यांच्‍या चरणी व्‍यक्‍त केलेली खरी कृतज्ञता ठरेल !

५. प्रार्थना

‘हे भूदेवी, हे श्रीसत्‌शक्‍ति, हे माते, आम्‍हा सर्व साधकांचे तुला साष्‍टांग नमन असो. अखंड गुरुसेवा करण्‍यासाठी आम्‍हाला बळ आणि चैतन्‍य दे. आमची गुरुदेवांप्रती निष्‍ठा वाढून त्‍यांना अपेक्षित अशी साधना तूच आमच्‍याकडून करून घे, देवी. आमच्‍याकडून काया-वाचा-मन यांद्वारे झालेल्‍या चुकांसाठी क्षमा कर. आम्‍हाला सतत गुरुचरणांचा ध्‍यास लागू दे.

गुरुदेवांच्‍या साधकांना सुंदर मोत्‍यांच्‍या हाराप्रमाणे गुंफून संघटित करणार्‍या हे भूदेवी, तुझ्‍या चरणी आम्‍ही सर्व साधक शरण आलो आहोत. आम्‍हाला तुझ्‍या चरणी आश्रय दे. हे श्री महालक्ष्मी स्‍वरूपिणी, श्रीसत्‌शक्‍ति, श्रीविष्‍णुरूपी गुरुदेवांचा संदेश, आशीर्वाद आणि चैतन्‍य तुझ्‍या माध्‍यमातून सर्व साधक-भक्‍तांना सतत मिळत राहो’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ४० वर्षे), चेन्‍नई, तमिळनाडू. (२.१०.२०२३)

गुरुदेवांच्‍या साधकांसाठी क्षण न् क्षण झटून साधकांसमवेत त्‍यांंच्‍या कुटुंबियांचीही पूर्ण काळजी घेणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

साधनेसाठी सर्वस्‍वाचा त्‍याग करून आश्रमात रहाणे सोपे नाही. अशा वेळी आश्रमातील साधकांच्‍या कुटुंबाचीही काळजी घेणे आवश्‍यक असते. साधनेसाठी तन-मन-धन यांचा त्‍याग करून आश्रमात आलेल्‍या साधकांना ‘साधनेसाठी पूरक वातावरण मिळावे’, यांसाठी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ मागील अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न करत आहेत. साधक पूर्णवेळ साधना करत असतांना काही वेळा त्‍यांच्‍या कुटुंबियांना आजारपण किंवा कौटुंबिक, मानसिक आणि अन्‍य अडचणी येतात. त्‍या वेळी ते गुरुदेवांना अडचणींविषयी निवेदन करतात. साधकांचे हे निवेदन ऐकून ते पूर्णत्‍वाला नेणारे गुरुदेवांचे रूप म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति होय ! ‘साधकांच्‍या अडचणी दूर व्‍हाव्‍यात’, यासाठी प्रयत्नरत असतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘स्‍वतःच्‍या वैयक्‍तिक जीवनाचे काय होईल ?’, याची कधीही काळजी केली नाही. आतापर्यंत त्‍या साधकांसाठीच सर्वकाही करत होत्‍या आणि आताही करत आहेत. ‘माझा एकेक क्षण गुरुदेवांच्‍या साधकांसाठीच आहे’, असा ज्‍यांना ध्‍यास लागला आहे, त्‍या म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ होय !