सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक अलौकिक आध्यात्मिक उत्तराधिकारी : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा अध्यात्मातील असामान्य अधिकार पुष्कळ आधीच ओळखणारे महान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे बोल खरे करणार्या महान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ! |
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा अध्यात्मातील असामान्य अधिकार पुष्कळ आधीच ओळखणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘साधारण वर्ष २०१३ मध्ये एकदा मी एका सेवेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘बिंदा केवढं करते ना ! (टीप) ती अध्यात्मात एवढी पुढे जाईल की, सनातनच्या इतिहासात एकमेवाद्वितीय ठरेल.’’ पुढे वर्ष २०१४ मध्ये चेन्नई, तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ईश्वरी प्रेरणेनुसार सनातन संस्थेसाठी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करण्यास आरंभ केला. जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून उच्च लोकांतील महर्षि सनातनला मार्गदर्शन करतात. या अंतर्गत वर्ष २०१६ पासून महर्षींनी आतापर्यंत अनेकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या असामान्य अधिकारांविषयी गौरवोद़्गार काढले आहेत. उदाहरणादाखल एक आशीर्वाद याप्रमाणे आहे – दिनांक ३०.५.२०१६ या दिवशी केलेल्या सप्तर्षी जीवनाडी पट्टीवाचनानुसार सप्तर्षी म्हणतात, ‘हे उत्तरापुत्री (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ), आपण श्री महालक्ष्मीचा अंश आहात. त्यामुळे आपल्याला काहीच अल्प पडत नाही. येणार्या काळात आपण सर्वांसाठी आदर्श असणार आहात.’
टीप : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सर्वत्रच्या साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवून त्यांना साधनेविषयी उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांचे मार्गदर्शन आणि वाणीतील चैतन्य यांमुळे अनेक साधकांची साधना चांगली चालू असून ते साधनेत प्रगती करत आहेत.
२. ‘सनातनची गुरुपरंपरा किती यथार्थ आहे’ याची प्रचीती देणारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भातील अनुभूती
‘प.पू. भक्तराज महाराज – प.पू. रामानंद महाराज – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ ही सनातनची गुरुपरंपरा आहे.
माझ्या भाग्याने मला काही वेळा प.पू. भक्तराज महाराज यांच्या दर्शनाचा योग आला. त्यांच्या सहवासात मला चंदनाच्या सुगंधाची अनुभूती येत असे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या संदर्भात मला वर्ष २०२१ मध्ये आलेली अनुभूती याप्रमाणे आहे – एकदा आध्यात्मिक कारणांमुळे मला होणार्या काही त्रासांनी मी पुष्कळच व्यथित झालो होतो. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची आठवण आली आणि त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या सहवासात मला जसा चंदनाचा सुगंध यायचा, तसाच सुगंध आला. (असे पुढेही एका प्रसंगात घडले.) तेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांनी जणू मला सांगितले, ‘मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या रूपात सतत तुझ्या सोबत आहेच.’ यामुळे माझे मन आनंदाने भरून आले. या प्रसंगातून मला ‘सनातनची गुरुपरंपरा किती यथार्थ आहे’ याची प्रचीती आली आणि ‘कोणत्याही कठीण समयी गुरुतत्त्व सोबत आहेच’, ही माझी श्रद्धाही दृढ झाली.
श्रीविष्णुस्वरूप मोक्षदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्री महालक्ष्मीदेवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री सरस्वतीदेवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हे तिन्ही गुरु आम्हा सर्व साधकांमध्ये सूक्ष्म रूपात आहेतच. त्यामुळे आम्हाला मोक्ष, धनसंपदा आणि ज्ञान यांची काळजीच करायला नको; कारण ते आपल्यापाशी असणारच आहे. केवळ आपला त्यांच्याप्रती तसा भाव असायला हवा. ‘तसा भाव आम्हा सर्व साधकांमध्ये लवकर निर्माण व्हावा’, अशी तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी (२०.९.२०२३)