श्राद्धाविषयी अपप्रचार करून धर्महानी करू नका !
आजकाल मुलांचे आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते. सनातन धर्माने देव, ऋषि, पितृ आणि समाज हे ४ ऋण सांगितले आहेत. त्यामुळे हिंदूंच्या मागील कित्येक पिढ्या हे ऋण उतरवण्यासाठी प्रयत्न करायचे. तथाकथित आधुनिकतेच्या नावाखाली आपण नवीन पिढीला धर्मापासून दूर केले आणि त्यांना धर्माची शिकवण दिली नाही. त्यामुळे आज आईवडीलच काय, नवी पिढी स्वार्थ सोडून अन्य कर्तव्यांविषयी सजग नाही. साहजिकच आई-वडिलांची जी परवड होत आहे, त्यामध्ये हेही एक कारण आहे. आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणार्या मुलांसाठी सामाजिक माध्यमांवर ‘श्राद्ध केले नाही, तरी चालेल; पण जिवंतपणे आई-वडिलांची काळजी घ्या’, असा अर्धवट सल्ला दिला जात आहे. जिवंतपणी आई-वडिलांची काळजी तर घेतलीच पाहिजे; पण ते गेल्यानंतरही त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी श्राद्धपक्ष एक विधीवत् शास्त्रीय विधान आहे. त्यामुळे ‘धर्माचा काडीमात्र अभ्यास नसतांना श्राद्ध करू नका’, अशा प्रकारचे सल्ले देणार्यांचे लिखाण प्रसारित करण्यापासून आपण स्वतःला थांबवले पाहिजे, अन्यथा धर्महानी होण्याला आपण उत्तरदायी असू.
आज तथाकथित आधुनिकतावाद्यांकडून श्राद्ध आणि हिंदु परंपरा यांविषयी काही अभ्यास नसतांना अकलेचे तारे तोडले जातात; पण विदेशातील लोक श्राद्धाचे शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन भारतात येऊन श्राद्ध करतात. यामध्ये हॉलिवूड अभिनेता सिलवेस्टर स्टेलोन किंवा नुकतेच रशिया आणि युक्रेन येथील अनेक महिलांनी भारतात येऊन केलेले श्राद्ध असेल. त्यामुळे हिंदूंनी तथाकथित आधुनिकतावाद्यांचे न ऐकता श्रद्धेने श्राद्ध करावे.
– श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश. (११.१०.२०२३)