हिंदूू पराक्रमी आहेत आणि रहातील ! – प्रा. राजेंद्र ठाकूर
कोल्हापूर – शौर्याचा इतिहास असलेल्या हिंदूंची शौर्यगाथा आजही कायम असून सूर्य, चंद्र असेपर्यंत हिंदूंची शौर्यगाथा कायम राहील. हिंदू पराक्रमी आहेत आणि रहातील. गेल्या ३ सहस्र वर्षांपासून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न झाला; पण तो यशस्वी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे हिंदू कधीही संपणार नाहीत, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र ठाकूर यांनी केले. ते विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेच्या निमित्ताने ‘प्रायव्हेट हायस्कूल’मध्ये आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
छत्रपती ताराराणी चौक येथून चालू झालेली शौर्य यात्रा रेल्वेस्थानक रस्ता, बिंदू चौकमार्गे प्रायव्हेट हायस्कूल येथे आली. तेथे सभा घेण्यात आली. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, उपाध्यक्ष शांतीभाई लिंबाणी, बजरंग दल जिल्हाप्रमुख श्री. पराग फडणीस, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सौ. अश्विनी ढेरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.
क्षणचित्रे
१. फेरीत भगवे ध्वज घेऊन पारंपरिक वेषात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेला विशेष रथ लोकांचे आकर्षण ठरला.
३. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक अत्यंत सुंदर आणि प्रभावी होते.
यात्रेचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत !या यात्रेचे कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मलकापूर येथे समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून रथाचे पूजन करण्यात आले, तसेच समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र-धर्म विषयक प्रबोधन केले. गडहिंग्लज येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचे स्वागत केले. या प्रसंगी श्री. संजय मुरुकटे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. निपाणी (कर्नाटक) येथे निघालेल्या यात्रेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल वैष्णव, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक श्री. अजित पारळे, ‘सद़्गुरु तायक्वांदो स्पोर्टस् अॅकॅडमी’चे संचालक श्री. बबन निर्मळे, धर्मप्रेमी श्री. राजू आवटे, श्री. श्रीनिवास पवार यांनी रथाचे पूजन केले, तसेच यात्रेत समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. |
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवक-युवतींनी शौर्य जागरण फेरीच्या मार्गावर शाहू मैदान, बिनखांबी गणेशमंदिर, मिरजकर तिकटी येथे स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. यात कराटे, लाठी-काठी, दंडसाखळी, तसेच अन्य प्रकारांचा समावेश होता. या प्रसंगी प्रतिकाराचे प्रसंग दाखवून कठीण प्रसंगांत स्वतःचा बचाव कसा करायचा ? ते दाखवले. प्रात्यक्षिके पाहून नागरिकांनी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात आले’, असे सांगितले. |