कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ग्रामस्‍थांकडून निषेध

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या हद्दवाढीला विरोध; १८ गावांमध्‍ये बंद !

जल्‍हाधिकारी राहुल रेखावार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना विविध गावांतील सरपंच, सदस्‍य, तसेच ग्रामस्‍थ

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर महापालिका स्‍थापन झाल्‍यापासून गेल्‍या ५० वर्षांत हद्दवाढ झाली नाही. हसन मुश्रीफ जिल्‍ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्‍यांनी २ दिवसांपूर्वी महापालिकेत आढावा बैठक घेऊन ‘माझ्‍या पद्धतीने हद्दवाढ करणारच’, असे विधान केले होते. त्‍यानंतर मुश्रीफ यांच्‍या विधानाच्‍या विरोधात गावांमध्‍ये संतप्‍त प्रतिक्रिया उमटली आणि त्‍याचा निषेध करत संभाव्‍य हद्दवाढीला विरोध करत १८ गावांमध्‍ये १२ ऑक्‍टोबरला कडकडीत बंद पाळण्‍यात आला. बंद असलेल्‍या गावांमध्‍ये उंचगाव, मुडशिंगे, उजळाईवाडी, गांधीनगर, चिंचवाड यांसह अन्‍य गावांचा समावेश आहे.

सकाळपासूनच ग्रामीण भागातील सर्व व्‍यवहार बंद होते. अनेक गावांमध्‍ये दुचाकी फेरी काढून निषेध व्‍यक्‍त करण्‍यात आला. उंचगाव येथे सरपंच मधुकर चव्‍हाण यांच्‍या नेतृत्‍वाखाली एकत्र येऊन घोषणाबाजी करण्‍यात आली. हद्दवाढ कृती समितीच्‍या वतीने १६ ऑक्‍टोबरला जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर लाक्षणिक उपोषण करण्‍यात येणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्‍या नेतृत्‍वाखाली, तसेच विविध गावांतील सरपंच, सदस्‍य, ग्रामस्‍थ यांनी एकत्र येऊन जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन दिले.