खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला !

दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांची ‘अफगाणिस्‍तान दुर्ग मोहीम’ !

खैबरखिंड

पुणे – पुरातन व्‍यापारी मार्गासह भारताच्‍या इतिहासात आक्रमकांची वाट म्‍हणून जिच्‍याकडे पाहिले जाते, त्‍या अफगाणिस्‍तान-पाक सीमेवरील खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला. पिरंगुट (ता. मुळशी) येथील गोळे सध्‍या अफगाणिस्‍तान येथे दुर्ग मोहिमेवर आहेत.

मारुति गोळे यांनी सांगितलेले इतिहासातील पैलू !

१. पुणे-दुबई-अफगाणिस्‍तान असा प्रवास चालू केला. ‘अफगाण डायरी’ मोहिमेत माझ्‍यासह पांडुरंग थरकुडे असून अहसनअल्ला सफी आमचे मार्गदर्शक आहेत.

२. अहमदशाह अब्‍दाली याच्‍यासह अन्‍य आक्रमक याच वाटेने देहली जिंकण्‍यासाठी भारतात आले. आज येथे पाहुण्‍यांचा पाहुणचार आणि सुरक्षा यांचे दायित्‍व घेतले जात असले, तरी विखुरलेला वारसा, कमालीची कट्टरता अन् वारशाविषयीचे औदासिन्‍य, तालिबानी राजवट यांखाली इतिहास दबला आहे.

३. पूर्वी लव-कुश पर्वत, गंधार देश म्‍हणजेच कंदाहार येथपासून सम्राट पृथ्‍वीराज चौहान यांच्‍यापर्यंत अनेक नावांचा इतिहास अफगाणिस्‍तानने साठवल्‍याने त्‍याच्‍या अभ्‍यासासाठी मोहीम आखली. प्रतिदिन विविध गडकोट आणि ठिकाणे यांना भेटी देत आहे. खैबरखिंड हा पुरातन व्‍यापारीमार्ग आहे. पूर्वी इराक-इराण-अफगाणिस्‍तान-हिंदुस्‍थान-चीन असा व्‍यापार चालत होता. आज हा भाग अफगाणिस्‍तान आणि पाक यांच्‍या सीमेवर असून दोन्‍ही बाजूंनी चौक्‍या आणि सुरक्षा आहे.

४. खैबरखिंड परिसरात अनेक ठिकाणी भुईमूग आणि सुकामेवा यांचे उत्‍पादन होते. अहमदशाह अब्‍दाली याचा इतिहास येथे अभिमानाने सांगतात; मात्र पुरातन वारशाविषयी अनेकांना माहिती नाही.

आपले पूर्वज येथे लढत आल्‍याने येथील माती घेऊन येत आहे ! – अधिवक्‍ता गोळे

खैबरखिंडीत जाण्‍याची अनुमती मिळवणे कठीण गेले. छत्रपतींच्‍या प्रेरणेतून महान सेनानी मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर आणि ज्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली अटक मोहीम घडली, ते राघोबादादा पेशवे आज पाकिस्‍तानस्‍थित लाहोरनंतर अटक अन् त्‍याहीपुढे पेशावर, जामरुद, जलालाबादपर्यंत गेले होते. स्‍थानिक सरदारांवर अंमल बसवून खैबर परिसरात त्‍यांनी चौक्‍या बसवल्‍या. यामुळे तेथे अभिमानाने भगवा फडकावला. आपले पूर्वज येथे लढत आल्‍याने तेथील माती आणत आहे.